

Woman Injured By Tiger
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील खातोडा येथे शेतात काम करीत असलेल्या महिलेवर वाघाने अचानक हल्ला करून जखमी केले. ही थरारक घटना रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. साधना मधुकर जांभूळे असे जखमी महिलेचे नाव आहे. या घटनेने खातोडा प्रचंड दहशत पसरली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमूर तालुक्यातील खातोडा येथील शेतकरी मधुकर जांभूळे आणि त्यांच्या पत्नी साधना मधुकर जांभूळे हे आपल्या शेतात हत्तीनाला जवळ पिकावर फवारणी करण्यासाठी गेले होते. पती मधुकर जांभूळे शेतात फवारणी करीत असताना त्यांच्या पत्नी साधना या झाडाखाली बसून होत्या.
त्याच वेळी दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात साधना जांभूळे जखमी झाल्या आहेत. त्यांनी आरडाओरड केल्याने वाघ घाबरून जंगलात पळून गेला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी महिलेला त्वरित उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
यावेळी क्षेत्र सहाय्यक नेरी बी. आय. तोडासे, वनरक्षक ए. एन. आळणे, वनरक्षक एस. डी. वडजे यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची चमू उपस्थित होती.
या घटनेमुळे खातोडा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने शेतकऱ्यांना शेतात जाताना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.