Tigress Attacks Forest Guard; Dies Mysteriously Within an Hour
चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा
सिन्देवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव-रत्नापूर शिवारात रविवारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला. एका वाघिणीने प्रथम बैलाची शिकार केली, त्यानंतर कर्तव्यावर असलेल्या वनरक्षकावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. मात्र, या घटनेनंतर अवघ्या तासाभरातच तीच वाघीण मृतावस्थेत आढळून आली. त्यामुळे मोठे गूढ निर्माण झाले आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, आज रविवारी सकाळी सुमारे ११:३० वाजण्याच्या सुमारास रत्नापूर शेतशिवारात शेतकरी मंगेश तोडफोडे आपल्या मक्याच्या शेतात गेले असता, त्यांना त्यांचा बैल मृतावस्थेत आढळला. संशय आल्याने त्यांनी परिसराची पाहणी केली असता, तेथे एक पट्टेदार वाघिण आणि तिचे तीन बछडे दिसून आले. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. वाघिणीचा मागोवा घेत असताना ती गोसीखुर्द कालवा पार करून रत्नापूर रस्त्यालगत दामोदर लोधे यांच्या शेताकडे गेली. यावेळी नाचनभट्टी येथील वनरक्षक सज्जन पारेकर घटनास्थळी पोहोचले असता वाघिणीने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात पारेकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे, तसेच उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली.
दरम्यान, या सर्व घटनेनंतर अवघ्या तासाभरातच रत्नापूर शिवारातील एका धान पिकाच्या शेतात तीच वाघिण मृतावस्थेत आढळून आली. एका बाजूला वाघिणीचा हल्ला आणि दुसरीकडे तिचा अचानक मृत्यू यामुळे संपूर्ण प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.
सदर वाघिण अंदाजे ९ ते १० वर्षांची असल्याचे सांगितले जात आहे. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, तिला अंतर्गत दुखापत झाली होती की अन्य कोणते कारण आहे, याचा तपास वनविभागाकडून सुरू करण्यात आला आहे. शवविच्छेदनासाठी नमुने पाठविण्यात आले असून अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे आणखी एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे वाघिणीच्या तीन बछड्यांचे भवितव्य. आईविना झालेल्या या बछड्यांचा शोध घेणे आणि त्यांचे संरक्षण करणे हे वनविभागासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
विशेष म्हणजे, गेल्या जानेवारी महिन्यापासून एक वाघीण आपल्या बछड्यांसह या परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली होती. तिच्या वारंवार दर्शनामुळे शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. मृत वाघीण ही तीच असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस विभागाने परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी सतत लक्ष ठेवून आहेत.
वन्यप्राण्यांची वाढती संख्या आणि त्यांचा गावालगत वाढता वावर यामुळे ‘मानव की वन्यजीव’ संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.