

चंद्रपूर: जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका येथे वाघाची दहशत दिवसेंदिवस वाढत असून काल बुधवारी (२५ मार्च) घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांनी संपूर्ण तालुका हादरला आहे. एका घटनेत शेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला केला असून त्या जखमी झाल्या आहेत. तर दुसऱ्या घटनेत मोहफुले वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या ८१ वर्षीय वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. या सलग घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापही व्यक्त होत आहे.
शेतात काम करताना महिलेवर अचानक हल्ला
पहिली घटना भेंडाळा येथे काल बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. येथील रहिवासी नंदा गोकुळदास बनसोड (वय ६०) या आपल्या सुनेसोबत शेतात मोहरी कापणीसाठी गेल्या होत्या. सकाळी शेतात नियमित काम सुरू असतानाच झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक नंदा बनसोड यांच्यावर झडप घातली.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शेतात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र नंदा बनसोड यांची सून युक्ता बनसोड तसेच शेजारच्या शेतातील मजूर यांनी आरडाओरडा करत वाघाला पिटाळण्याचा प्रयत्न केला. जोरात आरडाओरडा होताच वाघाने नंदा यांना सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. या हल्ल्यात नंदा बनसोड या किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना तत्काळ उपचारासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.
मोहफुले वेचायला गेलेल्या वृद्धाचा बळी
दुसरी आणि अधिक गंभीर घटना मरेगाव चक परिसरात घडली. येथील रहिवासी बळीराम देवश्या पेंदाम (वय ८१) हे बुधवारी सकाळी जंगलात मोहफुले वेचण्यासाठी गेले होते. दुपारपर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र बराच वेळ शोध घेऊनही त्यांचा काहीच मागमूस लागला नाही. त्यानंतर ही माहिती वनविभागाला देण्यात आली. वन कर्मचारी आणि गावकरी यांनी संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली. सायंकाळी सुमारे चार वाजताच्या सुमारास जंगल परिसरात बळीराम पेंदाम यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. मृतदेहावरील जखमा पाहता हा वाघाच्या हल्ल्याचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
वनविभागाची तपासणी व पंचनामा
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पुढील तपासणीसाठी मृतदेह सिंदेवाही ग्रामीण रुग्णालय येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. वनविभागाकडून घटनास्थळी पाहणी करण्यात आली असून परिसरात वाघाच्या हालचालींचा शोध घेतला जात आहे. तसेच नागरिकांनी जंगल परिसरात किंवा शेतात एकटे न जाण्याचा इशाराही वनविभागाने दिला आहे.
परिसरात भीतीचे वातावरण
एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाघाच्या हल्ल्याच्या घटना घडल्याने सिंदेवाही तालुका परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी, मजूर आणि जंगल परिसरात काम करणारे नागरिक भयभीत झाले आहेत. विशेषतः मोहफुले वेचण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. गावकऱ्यांनी वनविभागाकडे या वाघाचा बंदोबस्त करणे तसेच जंगलालगतच्या गावांमध्ये गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे बळीराम पेंदाम यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.