Amravati Crime : विषारी पाणी प्यायल्याने ५१ बकर्‍यांचा तडफडून मृत्यू

मासमापूर पांढरी येथील घटना
Amravati Crime News
विषारी पाणी प्यायल्याने ५१ बकर्‍यांचा तडफडून मृत्यू
Published on
Updated on

अमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव फाटाजवळ असलेल्या पांढरी मासमापूर येथे बुधवारी (दि.४) सकाळी ११ च्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. शेत तळ्यातील पाणी प्यायल्याने एकामागून एक तब्बल ५१ बकर्‍यांचा मृत्यू झाला. या धक्कादायक प्रकारामुळे स्थानिक महिला बचत गटाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पांढरी मासमापूर येथील मासूम महिला बचत गटाच्या महिला नेहमीप्रमाणे आपल्या बकर्‍या चारण्यासाठी शिंगमोडी नदीकाठी गेल्या होत्या. सकाळी १० वाजेनंतर बकर्‍यांना पाणी पाजण्यासाठी महिलांनी शेतकरी श्रीकांत रुचके यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी आपल्या शेतात तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेल्या तळ्यातील पाणी पाजण्यास सांगितले. मात्र, बकर्‍यांना हे पाणी प्यायल्यानंतर काही वेळातच एकामागून एक बकर्‍यांचा तडफडून मृत्यू झाला. महिलांनी तात्काळ गावात फोन करून माहिती दिली, परंतु डॉक्टर पोहोचेपर्यंत ५१ बकरी मृतमुखी पडल्या.

या घटनेमुळे संबंधित महिलांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. या महिलांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून सुमारे ६ लाखाचे कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू केला होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह याच बकरी पालनावर अवलंबून होता. नुकसान झालेल्या महिलांमध्ये शमशादबी मोहम्मद रियाज, शहनाजबी वाईद खा, जयबूनबी सालीमुद्दीन, हुस्नाबी शेख हमीद,शमाबी ईस्राईल खा, शबानाबी सलमान खा, शकिलाबी सय्यद रियाजूदिन व सलामाबी शेख इरफान यांचा समावेश यांचा समावेश आहे. या सर्व महिलांनी संबंधित शेतमालकावर गुन्हा दाखल करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार सूरज बोंडे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी न्याय वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच बकर्‍यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news