Chandrapur Schools Forest Conservation Program
चंद्रपूर : वन्यजीव संवर्धनाचा संदेश गावागावांत पोहोचविण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने समुदाय निसर्ग शिक्षण कार्यक्रमांतर्गत महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. वर्षभर राबविण्यात आलेल्या ‘निसर्गानुभव व संवर्धन शिक्षण कार्यक्रमातून’ १६३ शाळांमधील तब्बल ४,२७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या उपक्रमातून दहा अॅम्बेसेडर शाळांमधील २० विद्यार्थ्यांची ‘वन्यजीव दूत’ म्हणून निवड करण्यात आली असून हे विद्यार्थी आपल्या शाळा व गावांमध्ये वन्यजीव संवर्धनाचा संदेश पोहोचविणार आहेत.
वन्यजीव संवर्धनाबाबत स्थानिक समुदायामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबविण्यात आला. बफर क्षेत्रातील ६७ शाळांमध्ये BNHS, तर ३९ शाळांमध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानने विविध उपक्रमांचे आयोजन केले. या कार्यक्रमाला ब्रिटनमधील बॉर्न फ्री फाउंडेशनचेही सहकार्य लाभले.
कार्यक्रमात बफर क्षेत्रातील १०६ शाळांमधील २,३९७ विद्यार्थी आणि बफर क्षेत्राबाहेरील तसेच वन्यजीव कॉरिडॉरमधील ५७ शाळांतील १,८७३ विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांना जंगल सफारीसह जैवविविधता, वन्यजीव संवर्धन आणि मानव-वन्यजीव सहजीवन याविषयी प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देण्यात आले.
या उपक्रमांतर्गत दहा अॅम्बेसेडर हायस्कूल्सची निवड करून विद्यार्थ्यांची प्री-टेस्ट घेण्यात आली. याशिवाय ४४ शाळांमध्ये जैवविविधता जागृती सत्रे, ३३ प्राथमिक शाळांमध्ये पोस्टरद्वारे जनजागृती, ४८ शाळांमध्ये दृकश्राव्य सादरीकरणे व शैक्षणिक चित्रपट, ४८ शाळांमध्ये निसर्ग-आधारित शैक्षणिक खेळ आणि सर्व १०६ शाळांमध्ये ‘ट्रुथ अबाऊट टायगर’ या शैक्षणिक चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमानंतर घेण्यात आलेल्या पोस्ट-टेस्टमध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानात लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक वनस्पती व प्राणिजीवनाबाबत विद्यार्थ्यांचे ज्ञान ३० टक्क्यांवरून ७० टक्क्यांपर्यंत वाढले, तर जंगल आणि वन्यजीवांविषयी सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ३८ टक्क्यांवरून ६२ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे मूल्यमापनात दिसून आले.
या यशस्वी उपक्रमाची फलश्रुती म्हणून दहा अॅम्बेसेडर शाळांमधून प्रत्येकी एक मुलगा आणि एक मुलगी अशा २० विद्यार्थ्यांची ‘वन्यजीव दूत’ म्हणून निवड करण्यात आली आहे. हे विद्यार्थी आपल्या शाळा, गाव आणि स्थानिक समुदायामध्ये वन्यजीव संवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व आणि मानव-वन्यजीव सहजीवनाचा संदेश पोहोचविण्याचे काम करणार आहेत.
संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः मोफत आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या ताडोबा भेटीसाठी तसेच सुरक्षित परतीसाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.
हा कार्यक्रम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रभू नाथ शुक्ला आणि BNHS चे संचालक किशोर रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यामध्ये कुशाग्र पाठक, आनंद रेड्डी, विशाल माळी यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी, BNHS चे शिक्षण अधिकारी सौरभ दांडे, शशांक लाडेकर, प्रफुल्ल सावरकर आणि राजेश्वरी दयालवार यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या कार्यक्रमातून तयार झालेले ‘वन्यजीव दूत’ हे वन्यजीव आणि स्थानिक समुदाय यांच्यातील प्रभावी दुवा ठरतील. संवर्धनाचा संदेश गावागावांत पोहोचविण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतील. कार्यक्रमाला मिळालेल्या उत्साहवर्धक प्रतिसादामुळे येत्या काळात ‘ग्रेटर ताडोबा लँडस्केप’मधील आणखी गावांपर्यंत हा उपक्रम विस्तारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.प्रभू नाथ शुक्ल, क्षेत्र संचालक, ताडोबा