

Chindhichak Govt Girls Ashram School
चंद्रपूर: नागभीड तालुक्यातील चिंधीचक येथील शासकीय कन्या माध्यमिक आश्रमशाळेत मंगळवारी शाळा प्रवेशोत्सव व पालक मेळाव्याचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. बैलबंडी मिरवणूक, विद्यार्थिनींच्या बँड पथकाचे सादरीकरण, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि विविध उपक्रमांमुळे हा सोहळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूरच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती जागृती कुमरे उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते जगदीश सडमाके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे, कार्यालय अधीक्षक शरद चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील कांबडी, प्राध्यापिका रूपाली पाथोडे, सरपंच हरीजी वरठे, उपसरपंच प्रदीप समर्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रविण मसराम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सकाळी ९ वाजता गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरीचे प्रमुख आकर्षण म्हणजे विशेष सजविण्यात आलेल्या बैलबंडीतून नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना विविध पारंपरिक वेषभूषेत बसवून विद्यार्थिनींच्या बँड पथकासह चिंधीचक गावातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अध्यक्ष मा. जागृती कुमरे यांनीही बैलबंडीवर स्वार होत सहभाग घेतला आणि विद्यार्थिनींसोबत आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात मुख्याध्यापक मंगेश ब्राम्हणकर यांनी, शाळेच्या गुणवत्तापूर्ण निकालाबाबत तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांविषयी माहिती दिली.
यावेळी डॉ. स्वप्नील कांबडी यांनी विद्यार्थिनींना आरोग्य आणि स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले. सौ. रूपाली पाथोडे यांनी विद्यार्थिनींनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी बनून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा संदेश दिला. तर मा. जगदीश सडमाके यांनी विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांनी शाळेने गुणवत्तेचा स्तर अधिक उंचावत संस्थेचे आणि प्रकल्पाचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. कार्यक्रमानंतर विद्यार्थिनींनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तूंच्या कलादालनाला मान्यवरांनी भेट देऊन विद्यार्थिनींच्या कलागुणांचे कौतुक केले. त्यानंतर शालेय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन चंद्रशेखर धारणे यांनी केले, तर आभार प्रदीप डिब्बे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बोरकर, शहारे, वाढई, देविकर, कु. मसराम मॅडम, अनिल दोडके, सुरपाम आणि शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला पालक आणि विद्यार्थिनीनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.