Mahamaya Coal Washery Pollution Pudhari
चंद्रपूर

Mahamaya Coal Washery Pollution | महामाया कोलवॉशरी प्रदूषण प्रकरण तापलं; शेतकऱ्यांचे 68 लाखांहून अधिक नुकसान, मुनगंटीवारांची पोलिसांत तक्रार

प्रदूषण नियंत्रण मंडळावर कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप; नुकसानभरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Farmers Crop Loss

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बेलसनी परिसरात महामाया इन्फ्रा डेव्हलपर्स प्रा. लि.च्या कोलवॉशरीमुळे झालेल्या प्रदूषणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. 2024 पासून सुरू असलेल्या या प्रकल्पामुळे शेती, जनावरे आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याचा आरोप करत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांसह रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शासन समितीने 68 लाखांहून अधिक नुकसानीची नोंद करूनही भरपाई न मिळाल्याने संताप तीव्र झाला आहे.

प्रदूषणामुळे पिकांचे मोठे नुकसान

बेलसनी परिसरात कार्यरत असलेल्या कोलवॉशरी प्रकल्पातून निघणाऱ्या घाण पाण्यामुळे आणि धूरामुळे शेतीवर विपरीत परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कापूस, सोयाबीनसह विविध पिकांचे उत्पादन घटले असून अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. प्रदूषणामुळे जमिनीची गुणवत्ता खालावल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.

जनावरांवर आणि आरोग्यावरही परिणाम

फक्त शेतीच नव्हे तर जनावरांच्या आरोग्यावरही या प्रदूषणाचा परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. दूषित पाणी आणि हवेमुळे जनावरे आजारी पडत असून नागरिकांमध्येही श्वसनाचे आणि त्वचारोगांचे प्रमाण वाढल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

68 लाखांच्या नुकसानीची अधिकृत नोंद

शासन नियुक्त समितीने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला असून एकूण 68,61,864 रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद केली आहे. मात्र, इतक्या मोठ्या नुकसानीनंतरही शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. यामुळे प्रशासनाविरोधात नाराजी वाढत आहे.

मुनगंटीवारांचा अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

या प्रकरणात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तानाजी यादव यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करत संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

पर्यावरण मंत्र्यांची पाहणी, प्रकरणाला वेग

काही दिवसांपूर्वी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीही या भागाची पाहणी केली होती. त्यांच्या भेटीनंतर प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असल्या तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी,

  • प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पावर कठोर कारवाई करावी,

  • जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा,

  • भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात आदी मागण्या शेतकऱ्यांनी केली आहे.

महामाया कोलवॉशरी प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यावरणीय आणि शेतीविषयक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. प्रशासनाने तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय देतो का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT