Rare Wildlife Tragedy : चंद्रपूर–मूल राष्ट्रीय महामार्गावर एका दुर्मीळ नर चांदी अस्वलाचा मृतदेह आढळून आला.  Pudhari
चंद्रपूर

Rare Wildlife Tragedy : चंद्रपूर–मूल महामार्गावर दुर्मीळ 'चांदी अस्वला'चा अपघाती मृत्यू

आतापर्यंत चार अस्वलांचे बळी; पर्यावरणप्रेमींची एनएच-९३० वर तातडीने अंडरपास-ओव्हरपासची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Rare Wildlife Tragedy

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर–मूल राष्ट्रीय महामार्गावरील आगडी गावाजवळील जानाळा बीट, कक्ष क्रमांक ७१४ मध्ये आज (दि. ८ जुलै) सकाळी एका दुर्मीळ नर चांदी अस्वलाचा मृतदेह आढळून आला. या महामार्गावर आतापर्यंत चार चांदी अस्वलांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद असल्याने वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वन्यजीवांसाठी आवश्यक उपशमन उपाययोजना अद्यापही प्रत्यक्षात न आल्याने पर्यावरणप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दुर्मीळ चांदी अस्वलाचा रस्‍त्‍यावर मृत अवस्‍थेत आढळले

प्राथमिक माहितीनुसार, हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे सदस्य शशांक मोहरकर हे या मार्गाने जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला अस्वल मृतावस्थेत दिसले. त्यांनी तातडीने संस्थेचे अध्यक्ष दिनेश खाटे आणि सदस्य नाजिश अली यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत चिचपल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयाशी संपर्क साधला. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृत अस्वलाचा ताबा घेत पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली. हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे, नाजिश अली, इम्रान खान तसेच चिचपल्ली वनक्षेत्राचे वनरक्षक अनिल नालमवाड, वनमजूर विकास निकोडे आणि शंभू मडावी उपस्थित होते.

शरीरावरील केसांच्या रंगामुळे 'चांदी अस्वल' हे नाव

"चांदी अस्वल" हे अधिकृत वन्यजीवशास्त्रीय नाव नाही. अशा अस्वलांना चांदी अस्वल किंवा सिल्व्हर बेअर असे त्यांच्या शरीरावरील केसांच्या रंगामुळे म्हटले जाते.भारतात आढळणाऱ्या भालू (स्लॉथ बेअर) या प्रजातीतील काही अस्वलांच्या अंगावरील काळ्या केसांमध्ये वय, आनुवंशिक बदल किंवा रंगद्रव्याच्या नैसर्गिक बदलामुळे पाठीवर, खांद्यावर किंवा संपूर्ण शरीरावर चंदेरी-राखाडी छटा दिसते. त्यामुळे ते सामान्य काळ्या अस्वलांपेक्षा वेगळे दिसतात आणि स्थानिक पातळीवर त्यांना "चांदी अस्वल" असे संबोधले जाते. आज झालेल्या अपघातात मृत्यू झालेले अस्वलही अशाच दुर्मिळ चंदेरी रंगछटेचे असल्याने त्याला "चांदी अस्वल" म्हटले जात आहे. अशा रंगछटेची अस्वले अतिशय दुर्मिळ असल्याने वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये त्यांचे विशेष महत्त्व आहे.

अपघातांची मालिका सुरुच

चंद्रपूर–मूल महामार्ग हा विदर्भातील महत्त्वाचा वन्यजीव भ्रमणमार्ग मानला जातो. हा मार्ग कावल व्याघ्र प्रकल्प, कन्हाळगाव अभयारण्य, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य यांना जोडतो. त्यामुळे या परिसरातून वाघ, बिबट, अस्वल, सांबर, रानडुक्कर आणि इतर अनेक वन्यप्राणी नियमितपणे स्थलांतर करीत असतात. मात्र, महामार्गावर वन्यजीवांसाठी आवश्यक अंडरपास, ओव्हरपास, वेगनियंत्रण आणि इशारा व्यवस्था नसल्यामुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याची खंत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

प्रस्‍तावाची अंमलबजावणी नाही, वन्‍यजीवांचे जीव धोक्‍यातच

याच महामार्गावरील केसलाघाट परिसरात ऑक्टोबर २०२५ मध्ये 'के मार्क' या वाघिणीच्या पिल्लाचाही वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर वन्यजीव संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी जोर धरू लागली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली नसल्याने वन्यजीवांचे जीव धोक्यातच असल्याचे चित्र कायम आहे.हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीने या मार्गावरील वन्यजीवांच्या अपघाती मृत्यूंची सातत्याने नोंद ठेवत संबंधित विभागांकडे अनेकदा निवेदने सादर केली आहेत. राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, धानोरा (मुख्यालय चंद्रपूर) यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षात 'फॉरेस्ट प्री-कन्स्ट्रक्शन अ‍ॅक्टिव्हिटी' अंतर्गत वन्यजीव संरक्षणासाठी उपशमन उपाययोजनांचा प्रस्ताव मुख्य अभियंत्यांकडे मंजुरीसाठी पाठविल्याचे लेखी उत्तर दिले होते. मात्र, २०२६ चे अर्धे वर्ष संपत आले तरी या प्रस्तावाची अंमलबजावणी झालेली नसल्याने वन्यजीवांचे अपघाती मृत्यू सुरूच आहेत.

वन्यजीव संरक्षणासाठी पर्यावरणप्रेमींनी केलेल्‍या मागण्या

  • एनएच-९३० वर वन्यजीवांसाठी अंडरपास आणि ओव्हरपासची उभारणी करावी.

  • संवेदनशील जंगल परिसरात वाहनांच्या वेगावर कठोर नियंत्रण आणावे.

  • 'वाइल्डलाइफ क्रॉसिंग'चे फलक आणि रात्री परावर्तित होणारी चेतावणी व्यवस्था बसवावी.

  • वन्यजीवांच्या हालचालीच्या ठिकाणी सीसीटीव्ही व स्वयंचलित वेगनियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करावी.

  • प्रलंबित वन्यजीव उपशमन उपाययोजनांना तातडीने मंजुरी देऊन त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT