

Chandrapur Forest Department Alert Mode
चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात चार महिलांचा बळी घेतल्यानंतर संबंधित वाघाच्या शोधासाठी वन विभागाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत सिंदेवाही वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीतील कंपार्टमेंट क्रमांक 1836 मध्ये शुक्रवारी (दि.२२) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही भीषण घटना घडल्यानंतर वन विभाग संपूर्णपणे अलर्ट मोडवर आला आहे.
वन विभागाच्या माहितीनुसार, हल्ला करणारा प्राणी वाघ आहे की वाघीण, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र संबंधित नरभक्षकाची ओळख पटविण्यासाठी घटनास्थळी आणि आसपासच्या जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर तांत्रिक यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
वन विभागाने परिसरात तब्बल 20 ट्रॅप कॅमेरे तसेच 3 लाईव्ह कॅमेरे बसविले असून, संबंधित वाघाच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. जंगल परिसरातील संवेदनशील भागांमध्ये वन कर्मचाऱ्यांची गस्तही वाढविण्यात आली आहे. विशेष पथक जंगल परिसरात तैनात करण्यात आले असून वाघाच्या हालचालींचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे.
वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सायंकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत संबंधित वाघ अथवा वाघिणीची ओळख पटेल, असा विश्वास आहे. त्यानंतर प्राण्याला जेरबंद करण्याची कारवाई सुरू करण्यात येईल.” दरम्यान, चार महिलांच्या मृत्यूनंतर गुंजेवाहीसह परिसरातील गावांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगलालगतच्या गावांमध्ये वन विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना जंगलात न जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सध्या तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू असल्याने अनेक ग्रामस्थ जंगलावर अवलंबून आहेत. त्यामुळे वन विभागाने तातडीने संबंधित वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.