Chandrapur Bullet Theft Case
चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील चुनाळा येथून चोरीस गेलेल्या बुलेट मोटारसायकल चोरीचा राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने छडा लावला. पोलिसांनी वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात छापा टाकून २१ वर्षीय आरोपीला अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेली सुमारे एक लाख रुपये किमतीची बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आली.
चुनाळा येथील रहिवाशाने दिलेल्या तक्रारीनुसार, १२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११ वाजेपासून १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत त्यांच्या घरासमोर उभी केलेली काळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड क्लासिक मोटारसायकल अज्ञात व्यक्तीने चोरून नेली होती. या तक्रारीवरून राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तलोडी (कुटकी), ता. सेलू, जि. वर्धा येथे छापा टाकला. या कारवाईत अनुराग प्रवीण धाबर्डे (वय २१, व्यवसाय मजुरी, रा. तलोडी-कुटकी, ता. सेलू, जि. वर्धा) याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
आरोपीकडून चोरीस गेलेली काळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड क्लासिक मोटारसायकल क्रमांक MH 34 AX 1120, अंदाजे एक लाख रुपये किमतीची, जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत (उपविभाग राजुरा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, गुन्हे शोध पथकाचे प्रभारी सपोनि लक्ष्मण लोकरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, पोहवा अनुप डांगे, पोलीस अंमलदार शफीक शेख, मिलिंद जांभुळे, महेश बोलगोडवार, रमेश बस्सी आणि राजीव दुबे यांनी कारवाईत सहभाग घेतला.