चंद्रपूर | पुढारी वृत्तसेवा
राजुरा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मधील निवडणूक वातावरण सोमवारी अचानक तापले. भाजप उमेदवार अमोल चिल्लावार यांचे वडील आणि भाजप नेते पांडूरंग सावकार चिल्लावार हे मतदारांना पैसे वाटत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकाराची काँग्रेस नेते सुरज ठाकरे यांनी निवडणूक विभागाकडे तक्रार करून दखल घेतली असून प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.
प्रभाग क्रमांक ४ मधील या निवडणुकीत धक्का बसवणारी ही घटना उघड झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार अमोल चिल्लावार यांचे वडील पांडूरंग सावकार चिल्लावार हे मतदारांना रोख पैसे देताना दिसणारा व्हिडीओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून मतदारांमध्ये चर्चांना जोर आला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चिल्लावार यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या पिठाच्या चक्कीच्या शेडमध्ये मतदारांना दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात येत होती. काहींनी याला "टोकन अमाउंट" असेही संबोधले. व्हिडीओमध्ये पांडूरंग चिल्लावार यांच्या हातात ५०० रुपयांच्या नोटांची गड्डी स्पष्ट दिसत असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणाची नोंद घेत काँग्रेस नेते सुरज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. मात्र, या संदर्भात अद्याप अधिकृत तपास अहवाल किंवा कारवाईबाबत प्रशासनाकडून माहिती मिळालेली नाही.
तहसीलदार तथा नगरपरिषद निवडणूक प्रमुख ओमप्रकाश गोंड यांनी सांगितले
“रक्कमेचे वाटप सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या संदर्भातील व्हिडीओ आणि तक्रार आचारसंहिता प्रमुखांकडे पाठवली आहे. ते सध्या फील्डवर असून चौकशी सुरू आहे.”
निवडणूक आयोगाकडून पुढील कारवाईची प्रतीक्षा सुरू असून या प्रकरणामुळे प्रभाग क्रमांक ४ मधील निवडणूक अधिकच चुरशीची झाली आहे.