Maharashtra Assembly Monsoon Session
चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात उपचाराअभावी एका गर्भवती महिलेचा झालेला मृत्यू हा राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवरील गंभीर प्रश्न असून, ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक असल्याचे मत आमदार सुधाकर अडबाले यांनी व्यक्त केले. विधिमंडळाच्या सभागृहात नियम २६० अंतर्गत प्रस्तावावर बोलताना त्यांनी सरकारचे लक्ष या गंभीर घटनेकडे वेधले.
आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले की, देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७८ वर्षे झाली असून महाराष्ट्र विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करत आहे. समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग, मेट्रो, उड्डाणपूल आणि स्मार्ट सिटीसारख्या प्रकल्पांची चर्चा राज्यात होत असताना दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना आजही मूलभूत आरोग्य सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. जिवती तालुक्यातील घोडणकापी येथील २५ वर्षीय संगीता गेडाम यांना प्रसूतीसाठी तब्बल १२ किलोमीटर उचलून न्यावे लागल्याची धक्कादायक बाब त्यांनी सभागृहात मांडली. परिसरात योग्य रस्त्यांचा अभाव आणि वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे वाटेतच त्यांची प्रसूती झाली. प्रसूतीनंतर अतिरक्तस्राव (ब्लीडिंग) झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना राज्यासाठी अत्यंत लाजिरवाणी असल्याचे सांगत आमदार अडबाले यांनी दुर्गम आणि आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेची विदारक परिस्थिती अधोरेखित केली. त्यांनी म्हटले की, आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे पालकमंत्री असतानाही अनेक गावांपर्यंत आजही रस्ते, आरोग्य सेवा आणि इतर मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना जीव धोक्यात घालून उपचारासाठी प्रवास करावा लागत आहे.
यावेळी त्यांनी मृत संगीता गेडाम यांच्या कुटुंबीयांच्या परिस्थितीकडेही सभागृहाचे लक्ष वेधले. संगीता गेडाम या गावातील एकमेव अंगणवाडी सेविका होत्या. त्यांच्या पश्चात तीन वर्षांचे एक अपत्य आणि नुकतेच जन्मलेले नवजात बाळ असून, त्यांच्या संगोपनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, तसेच दुर्गम आदिवासी भागांमध्ये तातडीने रस्ते, रुग्णवाहिका सेवा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी सरकारकडे केली.