Pratibha Dhanorkar Viral Video Pudhari
चंद्रपूर

Pratibha Dhanorkar Video: बसमध्ये नेमकं काय घडलं? व्हायरल व्हिडीओवर प्रतिभा धानोरकरांचा संताप; म्हणाल्या, 'महिला खासदाराची...'

Pratibha Dhanorkar Viral Video: दिल्लीतील काँग्रेसच्या महामोर्चादरम्यान खासदार श्यामकुमार बर्वे यांनी प्रतिभा धानोरकर यांच्या गालावर हलकासा हात मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Rahul Shelke

Pratibha Dhanorkar Viral Video: दिल्लीतील काँग्रेसच्या महामोर्चादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये रामटेकचे काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे हे चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गालावर थट्टामस्करीत हलकासा हात मारताना दिसत आहेत. या व्हिडीओवरून राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

काँग्रेसमधील काही कार्यकर्त्यांनी या प्रकाराबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकारावर आता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे. आमच्यात कोणताही चुकीचा प्रकार घडलेला नाही. श्यामकुमार बर्वे हे आमच्यासाठी भावासारखे आहेत. त्यामुळे या व्हिडीओचा चुकीचा अर्थ काढून महिला खासदाराची बदनामी करणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

नेमकं काय घडलं होतं?

दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनासाठी काँग्रेसचे खासदार एका बसमधून रामलीला मैदानाकडे जात होते. त्यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर आणि वर्षा गायकवाड या बसमध्ये शेजारी बसल्या होत्या. तर रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे त्यांच्या जवळ उभे होते.

याच प्रवासादरम्यान खासदारांमध्ये गप्पा आणि थट्टामस्करी सुरू होती. त्यावेळी श्यामकुमार बर्वे यांनी प्रतिभा धानोरकर यांच्या गालावर हलकासा हात मारल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आणि त्यावरून चर्चांना सुरुवात झाली.

लग्नाच्या विषयावरून सुरू होती थट्टामस्करी

या संपूर्ण प्रकाराबाबत बोलताना प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले की, आम्ही सर्व खासदार बसमधून रामलीला मैदानाकडे जात होतो. त्यावेळी श्यामकुमार बर्वे नवीन कपडे घालून आले होते. आमच्यासोबत झारखंड आणि राजस्थानमधील काही खासदारही होते. त्यांच्याशी चर्चा सुरू असताना त्यांनी श्यामकुमार बर्वे यांच्या लग्नाबाबत सहज विचारणा केली.

त्यावर मी आणि वर्षा गायकवाड यांनी त्यांचे अजून लग्न झाले नसल्याचे सांगितले. ते पंचविशीच्या पुढे गेले असून, वयाच्या तिशीनंतर लग्न करणार असल्याची थट्टामस्करीही यावेळी केली. त्यानंतर श्यामकुमार बर्वे आमच्याजवळ आले आणि तुम्ही माझी अशी थट्टा का करता, असे म्हणाले. माझा मुलगा २२ ते २३ वर्षांचा झाला आहे, तरी तुम्ही माझ्या लग्नाची चर्चा करता, असे त्यांनी गंमतीने सांगितले.

याच संवादादरम्यान त्यांनी आधी माझ्या गालावर आणि त्यानंतर वर्षा गायकवाड यांच्या गालावर हलकासा हात ठेवला. समोरच्या आसनावर खासदार शोभा बच्छाव बसल्या होत्या. त्या त्यावेळी सेल्फी आणि व्हिडीओ काढत होत्या. त्यातूनच हा व्हिडीओ समोर आल्याचे धानोरकर यांनी सांगितले.

'श्यामकुमार बर्वे आमच्यासाठी भावासारखे'

या व्हिडीओवरून सुरू असलेल्या चर्चांवर नाराजी व्यक्त करताना प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, आम्ही सर्व खासदार एकाच ठिकाणी राहतो. एकत्र जेवतो आणि एकाच इमारतीत राहतो. आमच्यात कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. श्यामकुमार बर्वे हे आमच्यासाठी भावासारखे आहेत. त्यामुळे आमच्यातील थट्टामस्करीचा व्हिडीओ व्हायरल करून चुकीचा अर्थ काढला.

एखाद्या महिला खासदाराची विनाकारण बदनामी करणे योग्य नाही. या व्हिडीओमध्ये दाखवलेल्या प्रकारामागे कोणताही चुकीचा हेतू नव्हता. या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'महामोर्चाकडे लक्ष देण्याऐवजी क्षुल्लक व्हिडीओची चर्चा कशाला?'

दिल्लीमध्ये काँग्रेसचा महामोर्चा आणि आंदोलन सुरू असताना त्याऐवजी अशा क्षुल्लक व्हिडीओवर चर्चा करणे चुकीचे असल्याचेही प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले. आंदोलनातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याऐवजी एका व्हिडीओवरून वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. यामुळे विनाकारण महिला खासदाराची बदनामी होत आहे. प्रत्यक्षात असा कोणताही चुकीचा प्रकार घडलेला नाही, असे सांगत त्यांनी या वादावर स्पष्टीकरण दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT