Pellora Nirli Road Issue  
चंद्रपूर

Pellora Nirli Road Issue | पेल्लोरा–निर्ली रस्ता रखडल्याने ग्रामस्थ संतप्त; मंजुरी न मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

Pellora Nirli Road Issue | पाच वर्षांपासून प्रस्ताव धूळखात; विद्यार्थी, शेतकरी, भाविकांना मोठा त्रास ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर | पुढारी वृत्तसेवा

राजुरा तालुक्यातील पेल्लोरा–निर्ली हा अत्यंत महत्त्वाचा रस्त्याचा प्रश्न वर्षानुवर्षे रखडत असून ग्रामस्थांचा संयम आता सुटत चालला आहे. पाच वर्षांपासून प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने प्रस्ताव कागदोपत्रीच अडकून आहे. शेवटचा पर्याय म्हणून आगामी स्थानिक संस्था निवडणुकीत मतदानावर बहिष्काराचा गंभीर इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.

राजुरा तालुक्यातील पेल्लोरा–निर्ली या सुमारे तीन किलोमीटर रस्त्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या मार्गाचा अभाव शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह सर्वांनाच मोठ्या गैरसोयीचा ठरत आहे. कढोली (बु.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणे असो किंवा चंद्रपूरकडे दैनंदिन ये-जा असो, या रस्त्याची गरज अत्यंत महत्त्वाची आहे. परंतु रस्ता न झाल्याने नागरिकांना सध्या धिडशी मार्गे मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.

तसेच गावातील शिवमंदिराकडे जाणारा जवळपास एक किलोमीटरचा पांदण रस्ता अद्याप न झाल्याने शेतकरी तसेच महाशिवरात्रीला यात्रेला येणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी वारंवार निवेदन दिले तरीही प्रश्न सोडविण्याची गती अद्याप दिसून येत नाही.

कृषी उत्पन्न बाजार समिती (राजुरा) येथील संचालक उमाकांत धांडे यांनी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून खनिज निधीतून मंजुरीसाठी रस्त्यांच्या कामांचे अंदाजपत्रक तांत्रिक मान्यतेसह जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले. मात्र तब्बल पाच वर्षांचा कालावधी उलटूनही प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने प्रस्ताव फाईलमध्येच अडकून राहिला आहे.

या दिरंगाईबद्दल ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी असून, “प्रशासनाने शक्य त्या निधीतून तातडीने मंजुरी देऊन रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा आगामी स्थानिक संस्था निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

पेल्लोरा–निर्ली रस्ता आणि शिवमंदिर पांदण रस्ता या दोन्ही मार्गांमुळे गावाच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन ग्रामस्थांच्या दशकांपासूनच्या मागणीला न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT