

Neri Talodhi road accident
चंद्रपूर : नेरी–तळोधी मार्गावरील सारंगड फाट्याजवळ सोमवारी (दि. 8) च्या रात्री झालेल्या भीषण अपघातात प्रवीण जनार्धन रामटेके (वय 37, रा. चोरा–गूळगाव, ता. भद्रावती) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री 8.30 च्या सुमारास भरधाव ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर सरळ जंगलात जाऊन घुसले आणि चालक उसळून खाली पडल्याने जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 9) सकाळी उघडकीस आली.
प्रवीण रामटेके हे आपल्या सहकाऱ्यासह आयसर कंपनीचे ट्रॅक्टर आणि धान चुराई मशीन चौगान (ता. ब्रम्हपुरी) येथे दुरुस्तीला घेऊन गेले होते. मशीन दुरुस्तीसाठी सोडून ते सायंकाळी परत ट्रॅक्टर-सह परत चोरा गावाकडे निघाले.रात्री आठ वाजता नेरी–तळोधी मार्गावरील सारंगड फाट्याजवळ पोहोचताच भरधाव वेगातील ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. ट्रॅक्टर सरळ जंगलात 50 मीटर आत जाऊन घुसला. या दरम्यान चालक प्रवीण रामटेके उचलून खाली पडले आणि जागीच मृत्यू झाला.
सोबत असलेल्या सहकाऱ्याने कसाबसा पुढे जात असलेल्या ट्रॅक्टरची चावी फिरवून गाडी बंद केली. चालक प्रवीणजवळ जाऊन पाहिले असता ते मृत अवस्थेत असल्याचे दिसले. दुर्गम जंगल भाग असल्याने काय करावे हे न सुचल्याने तो सारंगड गावात पोहोचला आणि ग्रामस्थांना सर्व घटना सांगितली. काही लोकं आले परंतु रात्रीच्या अंधारामुळे घटनास्थळ शोधणे कठीण झाल्याने शोध मोहीम थांबवावी लागली.
आज सकाळी पुन्हा गावकऱ्यांसह केलेल्या शोधात प्रवीण रामटेके मृत अवस्थेत आढळले. तर ट्रॅक्टर रस्त्यापासून सुमारे 50 मीटर अंतरावर जंगलात जाऊन पडला होता. घटनेची माहिती मिळताच तळोधी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक लांबट सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला.