चंद्रपूर

Nagpur airport news | आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे विदर्भातील पर्यटन आणि खाण उद्योगांचे होईल ‘टेक-ऑफ’

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : नागपुरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्माणातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणून आजचा दिवस नागपूरकरांसाठी ऐतिहासिक आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे प्रवाशांची तर सोय होणारच आहे, शिवाय विदर्भातील पर्यटन आणि खाणकाम क्षेत्राच्या वाढीसाठी देखील ते महत्त्वाचे ठरणार आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज, गुरुवार, दि. २५ जून २०२६ रोजी केले.

नागपूर शहराला विमान वाहतूक क्षेत्राच्या माध्यमातून विदर्भातील औद्योगिक क्षेत्रासह कृषी क्षेत्रातील निर्यातीला सक्षम करण्यासाठी डॉ . बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरचे जीएमआर एरो कंपनीला हस्तांतरण करण्यात आले. यावेळी ना. श्री. गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी महापौर नीता ठाकरे, खासदार तथा माजी केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री प्रफुल्ल पटेल, खासदार श्यामकुमार बर्वे, खासदार माया ईवनाते, केंद्रीय नागरी विमान वाहतूक विभागाचे सचिव समीर सिन्हा, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, मिहान इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, जीएमआर एअरोचे अध्यक्ष जी.बी.एस राजू यांची प्रमुख उपस्थिती होती.

गडकरी यांनी नागपूरहून सिंगापूर आणि दुबई या शहरांना देखील कनेक्टिव्हिटी मिळावी अशी मागणी केंद्रीय नागरी वाहतूक मंत्र्यांना केली. ते म्हणाले ‘नागपूर हे झिरो माईलचे शहर आहे. येथून सव्वातासाच्या हवाई अंतरावर देशातील चार मोठी शहरे आहे. जगभरातील पर्यटक ताडोबा, पेंच, उमरेड येथे व्याघ्र दर्शनासाठी येतात. महाराष्ट्रातील ७५ टक्के खनीजे विदर्भात आहेत. नागपुरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक प्रकल्प येत आहे. नागपुरातील रस्ते उत्तम झाले आहेत. रेल्वे स्थानके आंतरराष्ट्रीय दर्जाची होत आहेत. मेट्रोचे जाळे पसरले आहे. लॉजिस्टिक हब म्हणून नागपूर उदयास येत आहे. पॅसेंजर आणि कार्गो हब म्हणून नागपूर विकसित होत आहे.’ नागपूरचा संत्रा जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या विमानतळावर संत्रा बर्फीचे स्टॉल लावण्याची सूचना देखील त्यांनी केली.

यावेळी गडकरी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बोधचिन्हाचे देखील अनावरण करण्यात आले. केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले, ‘नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रवासी क्षमता गेल्या १० वर्षांमध्ये जवळपास १० लाखांनी वाढली असून नवीन कंपनीकडे हस्तांतरण केल्यामुळे ही प्रवासी क्षमता दरवर्षी ६० लाखाहून अधिक वाढेल. एमआरओ, कार्गो हबच्या माध्यमातून हे विमानतळ आपल्या पूर्ण आर्थिक क्षमतेने विकसित होऊन 'एरोट्रोपोलिस' म्हणून नागपूर शहर उदयास येईल.’

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘विमानतळाच्या दुसऱ्या धावपट्टीवर प्रवासी आणि मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होणार आहे. नागपूरमध्ये असणाऱ्या वायुसेनेच्या मेंटेनन्स कमांड तसेच इतर संरक्षण विषयक आस्थापनांमधून मोठ्या प्रमाणात एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक केली जात आहे. या दुसऱ्या धावपट्टीच्या माध्यमातून नागपूर हे 'डिफेन्स एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग हब' अर्थात संरक्षण वाहतूक निर्मितीचे मुख्य केंद्र बनणार आहे. यामार्फत मोठी गुंतवणूक नागपुरात येणार आहे.’ विमानतळ केवळ नागपूरच नव्हे तर संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारताचे ग्रोथ इंजिन ठरेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT