Chandrapur Leopard Attack Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Leopard Attack | बिबट्याचा घरात घुसून हल्ला; १३ बकऱ्यांना ठार करून उपाशीच परतला

नवानगर तळोधीत मध्यरात्री थरार, नागरिकांमध्ये भीतीचे सावट

पुढारी वृत्तसेवा

Human-Wildlife Conflict Chandrapur

◾वन विभागाचे आवाहन व ग्रामस्थांची मागणी:

◾बिबट्याच्या मार्गावर कॅमेरे आणि पेट्रोलिंग सुरू

◾नागरिकांना सतर्क राहण्याचे वनविभागाचे आवाहन

चंद्रपूर : तळोधी (बा.) परिसरात मध्यरात्री वन्यजीव–मानव संघर्षाचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार घडला. ब्रह्मपुरी वनविभागाअंतर्गत येणाऱ्या तळोधी उप वनपरिक्षेत्रातील नवानगर तळोधीत बिबट्याने थेट एका घरामागील खोलीत घुसून बकऱ्यांच्या कळपावर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात 13 बकऱ्या ठार झाल्या, तर 2 बकऱ्या गंभीर जखमी झाल्या. मात्र, शिकार करूनही बिबट्याने एकही बकरी न खाता उपाशीच परतल्याने ही घटना संपूर्ण परिसरात भीतीसोबतच नवलाचा चर्चाविषय ठरली आहे.

नवानगर तळोधी येथे काल रात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास बिबट्याने घरात घुसून बकऱ्यांवर हल्ला केल्याची दुर्मिळ आणि धक्कादायक घटना उघडकीस आली. स्थानिक रहिवासी संदीप श्रीराम मोटघरे यांच्या तीन खोल्यांच्या घरामागील खोलीत त्यांनी उपजीविकेचे साधन असलेल्या बकऱ्या बांधून ठेवल्या होत्या.

खोलीला खिडकी असली तरी तिला लोखंडी ग्रील नसून केवळ कापड बांधलेले होते. याच कमकुवत जागेचा फायदा घेत बिबट्याने खिडकीतून आत शिरकाव केला आणि झोपेत असलेल्या बकऱ्यांवर अचानक झडप घातली. सर्व बकऱ्या दोरीने बांधलेल्या असल्याने ठार केलेली बकरी त्याला फरफटत नेता आली नाही. परिणामी अस्वस्थ झालेल्या बिबट्याने एकामागून एक 13 बकऱ्यांचा संहार केला.

सकाळी पाचच्या सुमारास बकऱ्या मृतावस्थेत आढळून आल्यावर हा थरार उघडकीस आला. प्रत्यक्ष शिकार करूनही बिबट्याने एकही बकरी न खाल्ल्याने वन्यजीव अभ्यासकही चक्रावले आहेत. एवढा मोठा ‘खाद्यसाठा’ समोर असूनही उपाशी परत जाण्याची ही घटना अत्यंत दुर्मिळ मानली जात आहे. सामान्यतः बिबट शिकार केल्यानंतर पोट भरतो; मात्र या घटनेत तो उपाशीच परतल्याचे जाणकार सांगतात.

घटनेची माहिती मिळताच वनविभाग सतर्क झाला. तळोदी वनपरिक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक मने यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने तातडीने एक लाईव्ह कॅमेरा तसेच दोन ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. यासोबतच रात्री नऊपासून पेट्रोलिंग सुरू करण्यात आली असल्याची माहिती क्षेत्र सहाय्यक मने यांनी दिली.

मात्र, बिबट्याने थेट वस्तीतील घरात घुसून हल्ला केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थ रात्री बाहेर पडण्यास घाबरत आहेत. लहान मुले, महिला आणि पाळीव जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, वनविभागाने तातडीने ठोस बंदोबस्त करून बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT