Chandrapur Municipal Corporation BJP vs Congress
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर आरोप–प्रत्यारोपांचे राजकारण चिघळले असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या दाव्यांवर चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “वडेट्टीवार हे खोटारडे असून त्यांना स्वतःच्या पक्षातील नगरसेवकही सांभाळता येत नाहीत,” असा थेट हल्लाबोल करत काँग्रेसमधील अंतर्गत विसंवाद उघडकीस आणला आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. मात्र या दाव्याला भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी तीव्र शब्दांत फेटाळून लावत वडेट्टीवारांवर गंभीर आरोप केले.
“वडेट्टीवार हे खोटारडे आहेत. त्यांना आपल्या पक्षातील नगरसेवक धड सांभाळता येत नाहीत. काँग्रेसमध्ये कोणताही समन्वय नाही. पळवापळवी सुरू आहे,” असा आरोप करत जोरगेवार म्हणाले की, “भाजपमध्ये मात्र सर्व नगरसेवक एकत्र आहेत. आमच्या नगरसेवकांचे फोन सुरू आहेत. त्यामुळे आमचे नगरसेवक तिकडे जाणे कदापि शक्य नाही.” उलट काँग्रेसचेच नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, ठाकरे गटाच्या शिवसेनेने महापौर पदावर दावा ठोकल्यावरही आमदार जोरगेवारांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “शिवसेनेची महापौर पदाची मागणी पूर्णपणे अव्यवहार्य आहे. त्यांच्या कडे महापौरपदाचा सक्षम उमेदवार आहे की नाही, हे आधी तपासले पाहिजे. आधी गट स्थापन करा, संख्याबळ जुळवा, त्यानंतर मागणी करा. उगाच काहीतरी मागणी करणे योग्य नाही,” अशा शब्दांत त्यांनी ठाकरे शिवसेनेला सुनावले.
राजकीय हस्तक्षेपावर भाष्य करताना जोरगेवार यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. “राजकीय पक्षात कुणी कुणाचा मालक नसतो. ज्याला जी भूमिका मिळते, ती त्याने वठवायची असते. वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात केलेली ढवळाढवळ चुकीची आहे,” असे ते म्हणाले. चंद्रपूर हा धानोरकर कुटुंबाचा मतदारसंघ असल्याचे सांगत त्यांनी, “सलग दोन वेळा लोकसभेत धानोरकर कुटुंबाने विजय मिळवला आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करण्याऐवजी मार्गदर्शन करावे,” असा सल्ला दिला. या वक्तव्यातून त्यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही अप्रत्यक्ष टोला लगावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
एकूणच चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजप–काँग्रेसमधील आरोपांची धार अधिक तीव्र होत असून, महापौरपदासाठीचे राजकारण दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचे होत चालल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.