

नागपूर: विदर्भातील चंद्रपूर आणि अकोला महापालिकांचे महापौर काँग्रेसचे होतील असा दावा अखिल भारतीय काँग्रेसचे प्रभारी कुणाल चौधरी यांनी केला आहे. नागपूर महापालिकेतील नगरसेवकांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत भाजपने साम-दाम-दंड-भेद पैसा सत्ता वारी माप खर्च केला दडपशाहीचे राजकारण केले. या सर्वांवर मात करीत काँग्रेसची कामगिरी चांगली राहिली नागपुरात आमचे नगरसेवक वाढले चंद्रपूरमध्ये आमची सत्ता येत आहे. याशिवाय अकोला महापालिकेत देखील काँग्रेसचा महापौर होणार आहे. संघ भाजपच्या ध्रुवीकरणाच्या लढाईत काँग्रेसची विचारधारा लोकांनी उचलून धरली आहे.
सत्ता आणि पैशाचा जागोजागी वापर केला जात असताना काँग्रेसचे मतदार, संख्याबळ वाढल्याचा दावा त्यांनी केला. एकीकडे काँग्रेस नेत्यांच्या वादात चंद्रपूरला भाजपची सत्ता येण्याची शक्यता बळावली असताना काँग्रेसच्या या दाव्यात कितपत सत्यता आहे हे येणाऱ्या काळच सांगणार आहे. मनपा निवडणूक निकालात कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने भाजप काँग्रेसची रस्सीखेच सुरू आहे.
काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार आणि खा प्रतिभा धानोरकर हे दोन मोठे नेते एकमेकांविरूद्ध उभे ठाकल्याचे चित्र आहे. वडेट्टीवार यांच्यावर आगपाखड करीत हा वाद सुटला नाही तर आम्ही आमची भूमिका घेऊ, असा इशारा खा प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे. काँग्रेस सोबतच आता काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक दोन गटांत विभागले गेले आहेत. त्यांना नागपूरच्या वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ठेवण्यात आले आहेत.