चंद्रपूर : कोरपना - यवतमाळ व तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुसद तालुक्यातील इसापूर चे 13 पैकी 9 व जैनत मंडलातील सातनाला धरणाचे 4 पैकी 3 दरवाजे काल शनिवारी उघडण्यात आले. परिणामी यवतमाळ, आदिलाबाद जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना , चंद्रपूर तालुक्यातील पैनगंगा व वर्धा नदीच्या काठावरील गावाच्या शिवेवर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी पातळीत अधिक वाढ होत असल्याने नदी काठच्या गावात पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे.
धरणातून सोडण्यात आलेल्या हजारो क्युसेक पाण्याच्या विसर्गामुळे नदीपात्र दोन्ही थडीच्या काठोकाठ भरून गावाच्या वेशीवर शिरण्यास सुरुवात झाली आहे. यातच शेत शिवार, पूल रस्ते पाण्याखाली आले आहे. यावर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चंद्रपूर - कोरपना तालुक्याला जोडणाऱ्या वर्धा नदीवरील धानोरा - भोयगाव मार्गावरील शनिवारी सायंकाळी नऊ वाजता च्या सुमारास पूलावर पाणी आल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प पडली आहे. यामुळे दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे.
पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे कोरपना तालुक्यातील कोडशी बूज - कोरपना , कोडशी बूज - कोडशी खु मार्ग तर यवतमाळ जिल्ह्याला जोडणारे गांधीनगर - तेजापूर, जेवरा - गाडेघाट, पिपरी - मूर्ती , परसोडा - पीपरड , कोडशी बूज - देऊरवाडा आदी मार्ग मध्य रात्रीपासून पूर्णतः बंद झाले आहेत. महसूल व पोलीस प्रशासनाकडून सदर मार्ग खबरदारी म्हणून बॅरिकेट लावून वाहतुकीसाठी बंद केले आहे. पैनगंगा नदीतील जल स्तर वाढत असल्याने नदी काठावरील गावात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यातच वनसडी - भोयगाव सह अनेक मार्ग नाल्यातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे बंद होण्याची शक्यता आहे.
कोरपना तालुक्यातील परसोडा, रायपूर, कोठोडा बूज , मेहंदी , पारडी , अकोला , भोईगुडा , जेवरा , तुळशी , गांधीनगर , कोडशी बूज , कोडशी खू, पिपरी, वनोजा , अंतरगाव, सांगोडा, कारवाई , विरुर , इरई , भारोसा , भोयगाव आदी नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नदी मध्ये पाण्याची पातळी वाढून बाहेर फेकली जात असल्याने पुराचे पाणी शेतशिवारात आले आहे. यातच कापूस, सोयाबीन, तूर आदी पिके पाण्याखाली येऊ लागली आहे. मोठ्या नुकसानीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तालुका प्रशासन पूर्व परिस्थितीवर सध्या नियंत्रण ठेवून आहे.