Gondpipri Vejgaon Illegal Sand Ghat
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अवैध रेती व्यवसायाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरी गोंडपिपरी तालुक्यातील वेजगाव (आर्वी) येथे अनधिकृत रेती घाट तयार करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कोणतीही अधिकृत परवानगी नसताना रेती घाट तयार करून या ठिकाणी शेकडो ब्रास रेतीचे मोठमोठे साठे करण्यात आले आहे. प्रशासकीय आणि खनिकर्म विभागाच्या आदेशांना न जुमानता रेती माफियांची मुजोरी वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
वेजगाव - लाठी मार्गावर येथे अनधिकृत रेती घाट तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी पोकलेनसारख्या यंत्रसामग्रीचा वापर करून रेतीचा साठा करण्यात आल्याची माहिती आहे. परिसरात रेतीचे मोठमोठे ढीग उभे असून शेकडो ब्रास रेती साठवून ठेवण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असताना महसूल विभाग गप्प आहे.
जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि जिल्हा खनिकर्म विभागाकडून अवैध रेती व्यवसायाला आळा घालण्यासाठी स्पष्ट निर्देश देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच जिल्ह्यात अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गस्त पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. मात्र, वेजगाव येथे अनधिकृत रेती घाट आणि हजारो ब्रास रेतीचे साठे तयार झाले असताना प्रशासनाचे लक्ष या प्रकाराकडे कसे गेले नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
स्थानिक पातळीवर कारवाईची जबाबदारी असलेल्या गोंडपिपरी तहसीलदार आणि धाबा मंडळ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रेतीचे साठे आणि यंत्रसामग्रीचा वापर झाल्याची माहिती समोर येत असताना प्रशासनाने अद्याप ठोस कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वेजगाव येथील अनधिकृत रेती घाटाची उच्चस्तरीय चौकशी करून प्रत्यक्ष पाहणी करावी, अनधिकृत रेतीसाठे आणि संबंधित यंत्रसामग्री जप्त करावी, तसेच या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून केली जात आहे.
आता जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि खनिकर्म विभाग या प्रकरणाची कितपत दखल घेतात आणि संबंधितांवर कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.