

Chandrapur news
चंद्रपूर : घटनास्थळी आढळलेल्या बुटांच्या पाऊलखुणा आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तांत्रिक कौशल्याने पोलिसांनी वरोरा पोलिसांनी लाखोंच्या घरफोडीचा यशस्वी छडा लावला आहे. हनुमान व्यायामशाळेजवळ झालेल्या घरफोडीप्रकरणी नागपूर येथील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल ३० लाख ३५ हजार १९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरोरा शहरातील हनुमान व्यायामशाळेजवळ राहणाऱ्या समीना अलीअसगर बोहरा या कुटुंबीयांसह १ नोव्हेंबर रोजी लग्नकार्यासाठी मुंबई येथे गेल्या होत्या. घराला कुलूप लावून गेलेल्या कुटुंबीयांना ५ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.३० वाजता घरी परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर फोडले आणि त्यातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा २६ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
या घटनेबाबत वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. घर तब्बल पाच दिवस बंद असल्याने चोरी नेमकी कोणत्या दिवशी झाली, हे निश्चित करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता संरक्षक भिंतीवरील लोखंडी गेटवर बुटांच्या तळव्यांच्या पाऊलखुणा आढळून आल्या. या खुणांचे निरीक्षण आणि धुळीच्या स्थितीचा अभ्यास करून पोलिसांनी चोरीच्या वेळेचा अंदाज बांधला. यानंतर ५ नोव्हेंबरच्या रात्री परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यात मध्यरात्रीच्या सुमारास एक संशयास्पद कार परिसरात फिरताना दिसून आली. पोलिसांनी या कारचा मागोवा घेतला. गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांची ओळख पटविण्यात आली. अखेर १० नोव्हेंबर रोजी नागपूर येथून दोघांना अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सत्येंद्र उर्फ राहुल राजबहादूर गुप्ता (वय ४१), रा. बाबा दिवाण मशीदजवळ, यशोधरानगर, नागपूर आणि प्रेम शालीकराम खत्री (वय ३५) रा. नौकन्या नगर, नागपूर अशी आहेत. पोलिसांनी आरोपींकडून २१०.६५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत २९ लाख ७० हजार १६५ रुपये), ५४.३८ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू (किंमत १९ हजार ३३ रुपये), रोख २५ हजार रुपये, तीन मोबाईल असा एकूण ३० लाख ३५ हजार १९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तपासादरम्यान घटनास्थळी मिळालेल्या पाऊलखुणांची आरोपींकडील बुटांशी पडताळणी करण्यात आली. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या संशयिताच्या टी-शर्टचीही तपासणी करून तो जप्त करण्यात आला. पोलिसांनी उपलब्ध पुराव्यांची योग्य सांगड घालत या गुन्ह्याचा उलगडा केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के व सहायक पोलीस निरीक्षक दहीफळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मनीष तालेवार आणि गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार संदीप मुळे, प्रशांत नागोसे, विशाल राजुरकर, मनोज ठाकरे, अमोल नवघरे, सुखराज यादव, महेश गावतुरे व सौरभ कुलथे यांनी ही कामगिरी यशस्वी केली.
परिसरात थेट सीसीटीव्हीची उपलब्धता नसतानाही पाऊलखुणा, तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि वाहनाचा मागोवा घेत पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली. वरोरा पोलिसांच्या या नियोजनबद्ध आणि कौशल्यपूर्ण तपासामुळे दोन आरोपींना अटक करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.