Gondpipri Husband Life Imprisonment
चंद्रपूर कोठारी : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची चाकूने वार करून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी पतीला चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मौजा कुडेसावली (ता. गोंडपिपरी) येथे घडलेल्या या खळबळजनक प्रकरणात मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. प्रकाश कदम (DJ-1) यांनी आरोपी धनपाल माधव रामटेके (वय ६०) याला दोषी ठरवत जन्मठेप व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
प्राप्त माहितीनुसार, ही घटना १२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८ ते ८.३० वाजताच्या सुमारास मौजा कुडेसावली येथे घडली होती. आरोपी धनपाल रामटेके याला पत्नी वंदना धनपाल रामटेके (वय ६०) हिच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयातून त्याने संतापाच्या भरात पत्नीवर चाकूने वार करून तिची हत्या केली होती. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
या प्रकरणी मृतक महिलेचा मुलगा अमर धनपाल रामटेके (वय ३०) याने कोठारी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यावरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास कोठारी पोलीस स्टेशनचे सपोनी योगेश खरसान यांनी अत्यंत बारकाईने व सखोल पद्धतीने केला. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, वैद्यकीय अहवाल तसेच केमिकल अॅनालायझर (C.A.) रिपोर्ट यासारखे महत्त्वाचे पुरावे संकलित करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
खटल्यादरम्यान सरकारी अभियोक्ता आसिफ शेख यांनी प्रभावी युक्तिवाद मांडला. सादर करण्यात आलेले सबळ पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे न्यायालयाने आरोपी धनपाल रामटेके याला भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत दोषी ठरवले.
न्यायालयाने आरोपीला आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावत ३ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास भोगावा लागणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून मपोशि मनीषा गोवर्धन चिवंडे (ब.नं. २८३३) यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.