

Chandrapur Summer Paddy Crop Damage
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील गिरगाव मंडळ अंतर्गत येणाऱ्या सोनूली चक, नांदेड आणि झाडबोरी या साजामध्ये मंगळवारी (दि. ५) दुपारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या उन्हाळी धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऐन कापणीच्या टप्प्यावर आलेले धान पीक जोरदार आलेल्या वादळ वारा आणि गारपिटीने जमिनीवर आडवे पडल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
दि. ५ मे रोजी दुपारी सुमारे २.३० ते ३.३० वाजताच्या दरम्यान परिसरात अचानक वातावरणात बदल होऊन ढगांच्या गडगडाटासह जोरदार वारे, मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. या अवकाळी संकटामुळे शेतातील उभे धान पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले. परिसरातील शेतशिवरात धान आडवे पडले आहे. धान जमीन दोस्त झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यावर्षी उन्हाळी धान पिकासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केला होता. वाढत्या खतांच्या, बियाण्यांच्या आणि कीटकनाशकांच्या किमतीमुळे आधीच शेतकरी आर्थिक अडचणीत होते. त्यातच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
“हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला,” अशी भावना परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत. अनेकांनी कर्ज काढून उन्हाळी धानाची लागवड केली होती. मात्र अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्या सर्व आशांवर पाणी फिरले आहे.
दरम्यान, बाधित भागाचा तातडीने पंचनामा करून शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.