Chandrapur Bus Fire | गडचिरोली - चंद्रपूर मार्गावर थरार : धावत्या ई-बसला भीषण आग; ४३ प्रवाशांची सुखरूप सुटका

चंद्रपूर मार्गावरील घंटाचौकीजवळ दुर्घटना घडली
Gadchiroli Chandrapur Road E-Bus Fire
Gadchiroli Chandrapur Road E-Bus FirePudhari
Published on
Updated on

Gadchiroli Chandrapur Road E-Bus Fire

चंद्रपूर : गडचिरोली ते चंद्रपूर मार्गावर धावणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई-बसला शुक्रवारी (दि. ८) दुपारी अचानक भीषण आग लागल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. सुदैवाने चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व ४३ प्रवाशांना वेळेत बाहेर काढण्यात यश आले आणि मोठी जीवितहानी टळली. मात्र काही क्षणांतच संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडून पूर्णतः जळून खाक झाली.

ही घटना दुपारी चार ते पाच वाजताच्या सुमारास चंद्रपूर मार्गावरील घंटाचौकीजवळ घडली. गडचिरोलीहून चंद्रपूरकडे निघालेली ९ मीटर ई-बस (क्रमांक एमएच ४९ बीझेड ४१८७) मूल बसस्थानकावरून प्रवाशांना घेऊन पुढे रवाना झाली होती. बस भरधाव वेगात असताना चालकाच्या निदर्शनास स्टेअरिंगजवळून धूर निघत असल्याचे आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली.

वाहक आणि चालकाने क्षणाचाही विलंब न लावता सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर उतरवले. दरम्यान, उन्हाच्या तीव्र झळांमुळे बसने काही क्षणांतच पेट घेतला आणि आगीने रौद्ररूप धारण केले. बघता बघता संपूर्ण बस ज्वाळांनी वेढली गेली. प्रवाशांनी हा थरार उघड्या डोळ्यांनी अनुभवला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन, अग्निशमन दल तसेच एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत बस पूर्णतः जळून खाक झाली होती.

या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ई-बसला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तांत्रिक बिघाडाचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले असून त्याचा परिणाम वाहनांवरही होत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. बसला आग लागल्यामुळे चंद्रपूर-मूल मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news