Nagbhid summer paddy loss
चंद्रपूर : वादळी वाऱ्यासह पडलेला अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्याने नागभिड तालुक्यात अंदाजे 684 हेक्टरवरील उन्हाळी धानपिकाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती तीन दिवसांच्या सर्व्हेत समोर आली आहे. पाच पैकी तीन मंडळात नुकसान झाले असून सर्वात जास्त नुकसान मिंडाळा मंडळात 351 हेक्टर, तळोधी (बा.) 257 हेक्टर तर गिरगाव मंडळात 76 हेक्टरचा समावेश आहे. फक्त मिंडाळा मंडळातील जनकापूर, पळसगाव, ओवाळा, चिंधीचक व चिंधीमाल येथील सर्व्हे जवळपास पूर्ण झाले असून उर्वरित गावांचे सर्व्हे सुरु आहे. त्यामुळे नुकसानीच्या आकडेवारी मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 4 ते 5 दिवसात सर्व्हे पूर्ण होईल, अशी माहिती नागभिड महसुल प्रशासनाने दिली आहे.
नागभिड तालुक्यात मे महिण्याच्या पहिल्याच तारेखला अवकाळी पाऊस कोसळला. वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपून काढले. त्यामुळे नागभिड तालुक्यातील मिंडाळा मंडळातील चिंधीचक, चिंधीमाल, किटाळी बोर.,जनकापूर, पळसगाव, ओवळा शेतशिवारत तर तळोधी (बा.) मंडळातील उश्राळमेंढा, गंगासागर हेटी, आकारपूर, सावर्ला,लखमापूर, खरकाडा,आलेवाही शेतशिवारातील अगदी शेवटच्या टप्यातील काढणीला आलेले उन्हाळी धानपिक शेतकऱ्यांच्या हातून गेले. त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यानंतर पुन्हा 3 मे ला सायंकाळीही गारपिटी आली. दोनदा झालेल्या गारपिटीच्या तडाख्याने उरलेसुरले धानपिकही नष्ट झालीत.
उभे धानपिक भूईसपाट झाले, शेतामध्ये धानाचा सडा पडला. मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे गेलेल्या शेतकऱ्यांनी 5 मे ला तहसीलदारांची भेट घेऊन नुकसान भरपाईची मागणी केली. त्यानंतर 6 मे पासून तालुक्यातील 138 गावांकरीता तहसीलदार प्रतापराव वाघमारे यांनी पंचनामे करण्याचे आदेश काढले. 1 ते 4 मे या कालावधीत नुकसान झालेल्या उन्हाळी धानपिकांच्या नुकसानीची माहिती हाती आली आहे. आदेशानंतर 6 ते 8 मे या कालावधीत करण्यात आलेल्या सर्व्हे मध्ये सुमारे 684 हेक्टरची नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नागभिड तालुक्यात पाच मंडळे आहे. त्यापैकी नागभिड व किरमिटी मंडळात नुकसान निरंक आहे. तर मिंडाळा, तळोधी बा., व गिरगाव मंडळात नुकसान झाली आहे. सर्वात जास्त नुकसान मिंडाळा मंडळात झाली आहे. 351 हेक्टर मधील 581 शेतकऱ्यांच्या उन्हाळी धानपिकांचे नुकसान झाले. त्यापाठोपाठ तळोधी बा. मंडळात 315 शेतकऱ्यांचे 257 हेक्टर मध्ये नुकसान झाले. येथील उश्राळमेंढा, उश्राळमेंढा रिठ येथील 75 टक्के तर आकापूर, वाढोणा येथील 50 टक्के सर्व्हे पूर्ण झाले आहे.
गिरगाव मंडळात 76 हेक्टर मध्ये नुकसान झाली आहे. येथे 95 शेतकरी नुकसानीपासून बाधीत झालेत. तिन दिवसांच्या सर्व्हे मध्ये मिंडाळा, तळोधी बा. व गिरगाव येथील अंदाजे 684 हेक्टर मध्ये नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. सर्वात जास्त गारपिटीचा तडाखा मिंडाळा मंडळातील चिंधीचक, चिंधीमाल, जनकापूर, पळसगाव, ओवाळा येथील शेतशिवाराला बसला. येथील येथील सर्व्हे जवळपास पूर्ण झाला आहे. तर उर्वरित ठिकाणी सर्व्हे सुरू आहे. चार ते पाच दिवसात सर्व्हे पूर्ण होणार असून या मध्ये नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता महसुल प्रशासनाने वर्तविली आहे. विशेष म्हणजे अवकाळी पाऊस व गारपिट येण्याची शक्यता वेळोवेळी हवामान खात्याकडून मिळत असल्याने यापुढे शेतमाल किंवा अन्य नुकसान झाल्यास सर्व्हे सुरूच राहणार आहेत. तसेच गारपिटीमुळे नुकसान झालेला एकही शेतकरी सर्व्हे पासून सुटणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याची माहिती तहसीलदार वाघमारे यांनी दिली आहे.