

Chandrapur Agriculture Loss in Hailstorm
चंद्रपूर : जिल्ह्यात वादळी वारा, गारपिटीसह मुसळधार पावसाने शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी दुपारी हजेरी लावली. बल्लारपूर, राजुरा, पोंभूर्णा या तालुक्यांत प्रचंड गारपीट झाली. वादळी पावसामुळे तापमानाचा पारा ४१ अंशापर्यंत खाली आला. भद्रावती तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून उन्हाची तीव्रता कमी होऊन तापमानाचा पाराही घसरला होता. अशातच शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी दुपारी वादळी पाऊस, गारपीट सुरू झाली. शनिवारी मध्यरात्री चंद्रपूर शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. शहरालगतच्या गावांतदेखील पाऊस झाला. मूल, नागभीड, सिंदेवाही ब्रह्मपुरी या तालुक्यांत गारपीट व पाऊस झाला. त्यानंतर रविवारी चंद्रपूर शहरात अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही गावांत गारपीट झाली. बल्लारपूर व राजुरा या दोन तालुक्यांत सर्वाधिक गारपीट झाली. दुपारच्या सुमारास जोरदार वादळी पाऊस झाला. राजुरा तालुक्यातील माथरा, गोवरी गोयेगाव, पवनी भागांमध्ये जोरदार पावसासोबत गारपीट झाली. याचा फटका फळबागा व भाजीपाला व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला. काही शेतकऱ्यांच्या शेतात मिरची होती. पावसामुळे मिरचीचे नुकसान झाले.
रविवारी दुपारनंतर अचानक आकाशात ढग दाटून आले व पावसाला सुरुवात झाली. काही क्षेत्रांमध्ये गारपीटही झाली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे लग्नसोहळे व इतर कार्यक्रमांना फटका बसला. राजुरालाही वादळी पाऊस, गोवरी परिसरात जोरदार गारपीट झाली. मिरची पिकाला फटका बसला. फळबागांमध्ये असणाऱ्या झाडांचेही नुकसान झाले. चार वाजताच्या सुमारास तालुक्यात पावसाने हजेरी लावली. काही भागांमध्ये जोरदार गारपीट झाली. बल्लारपूर शहर तसेच ग्रामीण भागात गारपीट झाली. पोंभूर्णा तालुक्यातील काही गावांनाही पावसाने झोडपून काढले तथा गारपीट देखील झाली. भद्रावती तालुक्यात दुपारपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस् सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होता. वरोरा तालुक्यातदेखील पावसाने हजेरी लावली. शनिवारी रात्री सावली तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
काल रविवारी 4 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास शहरात पुन्हा वादळी पाऊस सुरू झाला. वीजपुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र अंधार पसरला. वादळी पावसामुळे झाडे कोसळली. शहरात मुख्य मार्गावर भरणाऱ्या ‘संडे मार्केट’मधील दुकानांचे पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले. वादळामुळे रस्त्यावरील पाणठेले, चहाटपऱ्या आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक भागात घरावरील सोलर पॅनलदेखील उडाले.
सतत चार दिवसापासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुन्हा दोन दिवस हवामान खात्याने वादळी वारा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. अवकाळी पावसात यावेळी गारपिटीचा कडाका बसत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.