

चंद्रपूर : राजूरा तालुक्यातील रामपूर येथील कामगार नगरात गुरूवारी (दि.२४) दुपारी दोनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत छत्तीसगड राज्यातून आलेल्या कामगारांच्या झोपड्या पूर्णतः जळून खाक झाल्या. आगीमध्ये संसोरापयोगी साहित्य जळाल्याने कामगार उघड्यावर आले आहेत. आगीतमध्ये कोंबड्याचा होरपळून मृत्यू झाला.
राजूरा तालुक्यातील रामपूर येथील कामगार नगर आहे. या ठिकाणी छत्तीसगड राज्यातून बांधकामासाठी कामगार येतात. ते या ठिकाणी राहून काम करीत आपला संसार चालवितात. गुरूवारी दुपारी त्यांच्यातील एका झोपडीला अचानक आग लागली. काही वेळातच एकापाठोपाठ तीन झोपड्या आगीच्या विळख्यात सापडल्या. आग लागल्याचे कामगरांना लक्षात येताच त्यांनी आग विझविण्यासाठी धावपळ केली. व अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दल येईपर्यंत कामगारांनी आग आटोक्यात आणली होती. विशेष म्हणजे कामगारांनी वेळीच आग आटोक्यात आणण्यासाठी पुढाकार घेल्याने पुढच्या चार झोपड्यापर्यंत आग पोहोचली नाही. आगीमध्ये कामगारांचे मोठे नुकसान झाले असून संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जेव्हा आग लागली तेव्हा कामगार बाहेर कामाकरीता गेले होते.