चंद्रपूर

66 व्या गुंफा यात्रेत खाकीतील देवदूत; पोलिस शिपायाने वाचविले वृद्धाचे प्राण

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पावन तपोभूमी गोंदेडा येथे पार पडलेल्या ६६ व्या गुंफा यात्रा महोत्सवात श्रद्धा, अध्यात्म आणि सेवाभाव यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

पुढारी वृत्तसेवा

  • गोंदेडा येथील ६६ व्या गुंफा यात्रेत ७८ वर्षीय भक्त दलदलीत अडकला

  • पोलिस शिपाई राकेश दोडके यांनी जीवाची पर्वा न करता वृद्धाला वाचवले

  • तत्काळ वैद्यकीय मदतीमुळे वृद्धाची प्रकृती स्थिर

  • भाविकांचा “खाकीच्या रूपात गुरुदेव” जयघोष, पोलिसांचे कौतुक

चंद्रपूर | पुढारी वृत्तसेवा : ६ जानेवारी २०२६
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पावन तपोभूमी गोंदेडा येथे पार पडलेल्या ६६ व्या गुंफा यात्रा महोत्सवात श्रद्धा, अध्यात्म आणि सेवाभाव यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. लाखो भाविकांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या या यात्रेत एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला आणि खाकीतील माणुसकीने एका वृद्ध भक्ताचे प्राण वाचविले.

विदर्भातील सिंदेवाही तालुक्यातील जामसाळा येथून गुरुदेव भक्त मंडळ गोंदेडा यात्रेसाठी आले होते. या मंडळातील ७८ वर्षीय तानबा धर्माजी गायकवाड हे शौचास जाण्यासाठी शेताकडील बोडीकडे गेले असता अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते दलदलीत अडकले. चिखलात पाय खोलवर रुतल्याने ते हालचाल करू शकत नव्हते. काही वेळातच श्वासोच्छ्वासावर परिणाम होऊ लागला आणि वृद्धाचा जीव धोक्यात आला.

याच वेळी यात्रेतील बंदोबस्तावर असलेले पोलिस शिपाई राकेश दोडके यांना घटनेची माहिती मिळाली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दलदलीत अडकलेल्या वृद्धाची अवस्था पाहून त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता चिखलात उतरून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. मोठ्या कष्टाने त्यांनी वृद्धाचा हात पकडून त्यांना चिखलातून बाहेर ओढले आणि सुरक्षित ठिकाणी आणले.

मृत्यूच्या भीतीने हादरलेले तानबा गायकवाड अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पोलिस शिपायाकडे पाहत होते. दोडके यांनी त्यांना धीर देत पाणी पाजले आणि तत्काळ वैद्यकीय मदतीची व्यवस्था केली. पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार रोहित तुमसरे, प्रमोद गुट्टे तसेच स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले. वृद्धाला रुग्णवाहिकेतून प्राथमिक उपचारासाठी पाठविण्यात आले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि नंतर त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

या प्रसंगानंतर यात्रास्थळी उपस्थित भाविक भारावून गेले. “खाकीच्या रूपानं गुरुदेवच मदतीला धावून आले,” असा जयघोष भाविकांनी केला. पोलिस शिपाई राकेश दोडके यांच्या धाडसाचे आणि सेवाभावाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गुरुदेवांच्या विचारांतील मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याची अनुभूती या घटनेतून भाविकांना मिळाली.

६६ व्या गुंफा यात्रा महोत्सवातील हा प्रसंग खाकीतील माणुसकीचे जिवंत उदाहरण ठरला. पोलिस आणि स्वयंसेवकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेने यात्रेत श्रद्धेबरोबरच सेवाभावाची लाट उसळली असून, समाजात पोलिसांविषयीचा विश्वास आणि आदर अधिक दृढ झाल्याची भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT