

बुलडाणा, पुढारी वृत्तसेवा :
समृद्धी महामार्गावरून नागपूरहून मुंबईकडे जात असलेल्या खुराणा ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला अचानक आग लागल्याने बस जळून खाक झाली. चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील सर्व ३५ प्रवासी खाली उतरल्याने ते सुखरूप बचावले. मध्यरात्री शिवणी पिसा (ता. मेहकर) गावाजवळ ही घटना घडली.
बसने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने तात्काळ महामार्गाच्या कडेला बस थांबवली व आरडाओरडा करून सर्व प्रवाशांना खाली उतरवून घेतले. या गोंधळात काही प्रवाशांना खरचटले गेल्याने ते किरकोळ जखमी झाले. काही क्षणातच बस पूर्णपणे जळून खाक झाली.
या घटनेची माहिती कळताच महामार्ग पोलिसांचे पथक व अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. तत्पूर्वीच ही बस जळून खाक झाली होती. यामुळे काही काळ विस्कळीत झालेली समृद्धी महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गाने वळवून सुरळीत केली.
बसला आग लागण्याचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.