Truck Theft Gang Bhadrawati Chandrapur
चंद्रपूर : भद्रावती येथील एका व्यावसायिकाची फसवणूक करून दोन ट्रक हडप करणाऱ्या टोळीचा घुग्घुस पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ट्रक गॅस कटरने कापून त्यांचे तुकडे करण्यात आल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी नागपूर येथून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
भद्रावती येथील गोबिंद अतुल कुंडू यांच्या मालकीचे दोन टाटा डंपर (क्रमांक MH-29-BE-1656 आणि MH-29-BE-1657) खरेदी करण्याच्या बहाण्याने आरोपी साबीर अली सिराजुद्दीन सय्यद (रा. घुग्घुस) याने नोटरीद्वारे ताब्यात घेतले होते. मात्र उर्वरित रक्कम न देता त्याने फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली आणि दोन्ही ट्रक लंपास केले.
या प्रकरणी घुग्घुस पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी साबीर अली सय्यद याने दोन्ही ट्रक नागपूर येथील जिया उर रहमान उर्फ जिया अन्सारी याच्या ताब्यात दिल्याचे उघड झाले.
यानंतर घुग्घुस पोलिसांच्या पथकाने नागपूर येथे छापा टाकून जिया अन्सारी याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली देत साबीर अली यांच्या सांगण्यावरून दोन्ही ट्रक गॅस कटरने कापून त्यांचे तुकडे केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून ट्रकचे चेसिस तुकडे, टायर, ऑईल टाकी, फायबर बोनेट आणि इतर अवशेष जप्त केले.
दरम्यान, मुख्य आरोपी साबीर अली सिराजुद्दीन सय्यद याने छत्तीसगड राज्यातही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे समोर आले असून तो सध्या छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यात आहे. नागपूर येथील आरोपी जिया अन्सारी याने गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला असून त्याचा गुन्ह्यातील सहभागही निष्पन्न झाला आहे.
ही कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली घुग्घुस पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश राऊत यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन तायवडे यांच्या मदतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस शिपाई परमेश्वर डोईफोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
वाहन विक्री किंवा भाड्याने देताना वाहन मालकांनी विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. फसवणूक टाळण्यासाठी गाडी विकताना केवळ नोटरीवर विसंबून न राहता बँकेचे कर्ज अधिकृतपणे खरेदीदाराच्या नावावर हस्तांतरित करणे, खरेदीदाराची पार्श्वभूमी तपासणे, सिबिल स्कोर पडताळणे तसेच आरटीओकडील कायदेशीर हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय वाहन दुसऱ्याच्या ताब्यात देऊ नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.