

चंद्रपूर : जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीदरम्यान मोबाईल वापरण्यावर सक्त मनाई असताना वरोरा येथील भाजप आमदार करण देवतळे यांनी नियमभंग केल्याची बाब समोर आली आहे. त्यांनी सफारीदरम्यान तयार केलेली एक ‘रिल’ सोशल मीडियावर पोस्ट केली असून त्या व्हिडिओमध्ये जिप्सीच्या आरशात मोबाईल स्पष्ट दिसत असल्याने त्यांनी मोबाईल वापरल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ताडोबा प्रशासन सर्वसामान्य पर्यटकांप्रमाणे आमदारांवरही कारवाई करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा देशातील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पांपैकी एक मानला जातो. येथे दरवर्षी हजारो पर्यटक व निसर्गप्रेमी जंगल सफारीसाठी येतात. वन्यजीवांचे संरक्षण आणि जंगलातील शिस्त राखण्यासाठी ताडोबा प्रशासनाने अनेक कडक नियम लागू केले आहेत. त्यामध्ये सफारीदरम्यान मोबाईल फोन वापरणे किंवा जवळ बाळगणे यावर सक्त मनाई करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास पर्यटकांवर पाच हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
अशा परिस्थितीत वरोरा येथील भाजप आमदार करण देवतळे यांनी ताडोबा प्रशासनाचा नियम मोडल्याची घटना समोर आली आहे. आमदार देवतळे यांनी नुकतीच ताडोबा बफर झोनमधील निमढेला गेटवरून सपत्नीक जंगल सफारी केली. सफारीदरम्यान त्यांनी एक व्हिडिओ तयार करून त्याची ‘रिल’ सोशल मीडियावर पोस्ट केली. मात्र या रिलमध्ये जिप्सीच्या आरशात मोबाईल स्पष्टपणे दिसून येत असल्याने सफारीदरम्यान मोबाईल वापरल्याचा आरोप करण्यात येत आहे.
ताडोबा प्रशासनाच्या नियमांनुसार कोअर आणि बफर क्षेत्रात प्रवेश करताना पर्यटकांना मोबाईल फोन जवळ ठेवण्यास किंवा वापरण्यास मनाई आहे. वन्यजीवांना त्रास होऊ नये, तसेच पर्यावरणाचा समतोल बिघडू नये यासाठी हा नियम कडकपणे पाळला जातो. अनेकदा साध्या पर्यटकांवर नियमभंग केल्याबद्दल दंडात्मक कारवाईही करण्यात आलेली आहे.
मात्र या प्रकरणात एका आमदाराकडूनच नियमभंग झाल्याचा आरोप समोर आल्याने चर्चेला उधाण आले आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पर्यटक आणि पर्यावरणप्रेमींकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सर्वसामान्य पर्यटकांवर काटेकोर नियम लावणारे ताडोबा प्रशासन आमदारांवरही तशीच कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.