चंद्रपूर : गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.३) पुन्हा शहरात तणाव वाढला आहे. भाजपचे प्रभाग ९ चे उमेदवार सुरज पांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अरुण निमजे यांचे भाऊ प्रकाश निमजे (वय ६५) यांच्यावर वीट फेकून प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या मारहाणीत प्रकाश निमजे गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गडचांदूर नगरपरिषद निवडणूकी दरम्यान गडचांदूर शहरात राजकीय वैमनस्याचा कळस गाठणारी घटना उघडकीस आली. भाजपचे प्रभाग ९ उमेदवार सुरज पांडे यांनी ६५ वर्षीय प्रकाश निमजे यांच्या दिशेने अचानक वीट फेकून हल्ला केला. हा हल्ला इतका गंभीर होता की प्रकाश निमजे यांच्या डाव्या कानाला व डोक्याला खोल जखमा झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या सुरज पांडे याला भाजपने उमेदवारी दिल्यामुळे नागरिकांचा राग उफाळून आला आहे. “गुन्हेगाराला उमेदवार कसा?” असा सवाल करत सर्वपक्षीय नागरिकांनी आज सकाळी घटनेनंतर गडचांदूर पोलिस स्टेशनवर एकच गर्दी केली.
पोलिस ठाण्यात सुरज पांडे याला स्वाधीन करण्याची मागणी नागरिकांनी सातत्याने केली. या पार्श्वभूमीवर वातावरण अधिकच तापले असून शहरातील शांतता भंग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सुरज पांडेच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे आधीच शहरातील कायदा-सुव्यवस्था ढासळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे त्याला तात्काळ तडीपार करण्यात यावे, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, निषेधाच्या रूपात आंदोलनकर्त्यांनी आज शहरातील विविध भागांमधून निषेध रॅली काढली. तसेच बाजारपेठ बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे गडचांदूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी वाढीव बंदोबस्त तैनात केला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील घडामोडींच्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.