

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस वगळता 10 नगरपरिषद व नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आज पार पडली. दुपारी साडेतिन वाजेपर्यंत ३९.८७ टक्के मतदान पार झाले. त्यानंतर सायंकाळी उशिरा मतदार मतदानासाठी घराबाहेर पडल्याने वेळेनंतरही मतदाराची प्रक्रिया सुरूच होती. त्यामुळे मतदानाची अंतीम आकडेवारी प्राप्त झाली नाही. मात्र 60 ते 65 टक्के पर्यंत मतदान पोहचेल असे सांगितले जात आहे. गडचांदूर येथील नगर परिषदेमध्ये एका मतदाराने इव्हिएम यंत्राची तोडफोड वगळता अन्य ठिकाणी निवडणूक शांततेत पार पडली.
घुग्घूसची निवडणूक स्थगित करण्यात आल्याने बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, ब्रम्हपुरी, मूल, राजुरा, गडचांदूर, नागभीड, चिमूर आणि भिसी या 10 नगरपरिषद/नगरपंचायतींमध्ये सकाळ सात वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली. 10 ठिकाणांतील 122 प्रभागांतून 226 सदस्यांना निवडून देण्याकरीता मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 10 नगराध्यक्ष पदांकरिता 65 उमेदवार आणि 226 सदस्यांकरीता 1089 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 339049 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार होते. त्यामध्ये पुरुष मतदार : 169305, महिला मतदार: 169737, व इतर : 7 मतदारांचा समावेश आहे. महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त असून निवडणुकीत महिलांचा निर्णायक कौल परिणामकारक ठरणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील १० नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० दरम्यान 39.87 टक्के मतदान पार पडले. जिल्ह्यातील एकूण ३,३९,०४९ पैकी १,३५,१९४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्याची एकूण मतदान टक्केवारी ३९.८७% अशी नोंदविली गेली. दुपारपर्यंत भिसी नगरपंचायतीमध्ये सर्वाधिक म्हणजे ६७.५२% मतदान झाले तर सर्वात कमी मतदान ३०.६५% चिमूर नगरपरिषदेत झाले. विशेष म्हणजे आज सकाळ पासून दुपारपर्यंत मतदानाला थंड प्रतिसाद मिळाला. दुपारी 3 वाजेनंतर मतदार घराबाहेर पडले. त्यामुळे बहुतांश ठिकाणी मतदारांच्या मतदान केंद्रावर रांगा बघायाला मिळाल्या. कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे वेळसंपल्यानंतरही मतदाराची गर्दी पहायाला मिळाली.
जिल्ह्यातील एकूण ३,३९,०४९ पैकी १,३५,१९४ मतदारांनी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावला. बल्लारपूर येथे ३७.४९ टक्के, भद्रावती ३५.९३, ब्रह्मपुरी ४४.७९, चिमूर 32.37, गडचांदूर 30.65, मुल ४६.३९, नागभीड ५१.४६, राजुरा ३९.३९,वरोरा ३४.५३, तर भिसी येथे ६७.५२ टक्के सर्वाधिक मतदान आले. जिल्ह्यातील 10 ही ठिकाणी मतदानाचा उत्साह दिसून आला. नागभीड, मुल, ब्रह्मपुरी येथे समाधानकारक मतदानाची नोंद झाली तर चिमूर, भद्रावती, वरोरा आणि बल्लारपूरमध्ये अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले.
सकाळ पासून दुपार पर्यंत मतदारांचा प्रतिसाद फारसा दिसून आला नाही. तर तिन वाजेनंतर मतदार घरबाहेर पडल्याने मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा बघायला मिळाल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर वेळेनंतरही मतदान सुरूच होते.