Maharashtra Farmers Aid Issue
चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावर काल लोकसभेत मोठा गहजब झाला. न्याय मिळावा, या भूमिकेतून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला.
मात्र, यावर उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी “राज्य सरकारने केंद्राकडे मदतीचा प्रस्तावच पाठवलेला नाही” असे विधान करताच वातावरण पेटले. कृषिमंत्र्यांच्या या वक्तव्याला धानोरकर यांनी “बेजबाबदार आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे” असे म्हणत तीव्र निषेध नोंदवला.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज असल्याने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी हा मुद्दा लोकसभेत मांडला.
मात्र, उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्य सरकारने केंद्राकडे अद्याप शेतकरी मदतीचा प्रस्ताव पाठवलेलाच नाही, असा दावा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे शेतकरी मदतीच्या प्रक्रियेबाबत नवे प्रश्न निर्माण झाले.
धानोरकर यांनी कृषिमंत्र्यांच्या विधानाचा निषेध करताना म्हटले की, “भारत हा कृषीप्रधान देश आहे. अशा देशाचा कृषीमंत्रीकडून जबाबदार वक्तव्य अपेक्षित असते. राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला नसता, तर केंद्र सरकारने मदत जाहीर कशी केली? मदत जाहीर झाली म्हणजे प्रस्ताव पाठवला होता, हेच सिद्ध होते.
तसेच लोकशाहीच्या मंदिरात अशा प्रकारे दिशाभूल करणारे विधान करणे ही शेतकऱ्यांच्या भावनांशी थट्टा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणामुळे अतिवृष्टीतील शेतकरी नुकसानीवर केंद्र-राज्य सरकारांमधील समन्वयाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शेतकऱ्यांना मदत मिळण्यास विलंब होऊ नये, यासाठी तातडीने कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.