"Due to rising heat in Chandrapur, keep schools and colleges open only during the morning session, until 11:00 AM."
चंद्रपूर | पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.
दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून जास्तीत जास्त सकाळी 11 वाजेपर्यंत सोडण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा वसुमना पंत यांनी या निर्देशांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता बाळगावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.