चंद्रपूर

Dr. Vinod Bahade IFS | चंद्रपूरच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप; डॉ. विनोद बहाडे यांची कोलंबियात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती

विसापूरच्या भूमिपुत्राने गाठले जागतिक व्यासपीठ; चंद्रपूरसह विदर्भात अभिमानाचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली असून, बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावचे सुपुत्र डॉ. विनोद बहाडे यांची दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही महत्त्वपूर्ण नियुक्ती जाहीर केली असून, त्यांच्या या यशामुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्हा आणि विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

भारतीय परराष्ट्र सेवेतील (IFS) 2007 च्या तुकडीतील अधिकारी असलेले डॉ. विनोद बहाडे सध्या परराष्ट्र मंत्रालयात सहसचिव म्हणून दहशतवादविरोधी विभागात कार्यरत आहेत. आपल्या कर्तृत्व, मुत्सद्देगिरी आणि प्रशासनातील कौशल्याच्या जोरावर त्यांनी परराष्ट्र सेवेत विशेष ओळख निर्माण केली आहे.

डॉ. बहाडे यांनी यापूर्वी जगातील विविध महत्त्वाच्या देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांनी व्हिएतनामची राजधानी हनोई, ऑस्ट्रेलियातील सिडनी, इजिप्तची राजधानी कैरो तसेच अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. येथील भारतीय दूतावासांमध्ये विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. आंतरराष्ट्रीय संबंध, सुरक्षा विषय आणि दहशतवादविरोधी धोरणांवरील त्यांचा अभ्यास आणि अनुभव विशेष मानला जातो.

ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विसापूरसारख्या छोट्या गावातून बाहेर पडून त्यांनी कठोर परिश्रम, अभ्यास आणि जिद्दीच्या बळावर देशातील सर्वोच्च प्रशासकीय व राजनैतिक सेवेत मानाचे स्थान मिळवले आहे. त्यांच्या नियुक्तीची बातमी समोर येताच चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT