जिवती येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य ‘शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.  Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Congress | शेतकरी व जनसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी जिवतीत काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा

Jivti Congress Rally | महागाई, बेरोजगारी, शेतमालाला भाव व अपयशी धोरणांविरोधात तीव्र आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

Congress Jan Akrosh Morcha Jivti

चंद्रपूर : राज्यातील शेतकरी, युवक व सर्वसामान्य जनता महागाई, बेरोजगारी आणि सरकारच्या अपयशी धोरणांमुळे मोठ्या संकटात सापडली असून या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी जिवती येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य ‘शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. शेतकरी व जनतेच्या विविध न्यायहक्कांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्यात आल्या.

राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनता सध्या महागाई, बेरोजगारी, अपूर्ण विकासकामे आणि सरकारच्या अपयशी धोरणांमुळे मोठ्या संकटाला सामोरे जात आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळत नसताना उत्पादन खर्च मात्र सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे, तरुणांच्या हाताला रोजगार नाही, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या असून जनतेचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकरी व जनसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी जिवती येथे काल मंगळवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने व मित्र पक्षांच्या सहकार्याने भव्य ‘शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा’ आयोजित करण्यात आला. हा मोर्चा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे, राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक व नगराध्यक्ष अरुण धोटे आणि तालुकाध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांच्या मार्फत महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांना पाठविण्यात आले.

मोर्चामध्ये आदिवासी व गैर-आदिवासी पट्टेधारकांना नोटीस पाठवून पट्टे रद्द करण्याचे आदेश तात्काळ स्थगित करावेत, सातबारावर वारसांची नोंद करावी, कुमारी अनुष्का किरण पाटोळे या विद्यार्थिनीच्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, हरिभाऊ राठोड यांना अपमानास्पद बोलल्याबद्दल विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा, संजय गांधी निराधार व वृद्धापकाळ योजनेतील लाभार्थ्यांना जन्म दाखल्याची अट रद्द करावी, वीज मीटर बिलवाढ रद्द करावी, मनरेगा योजनेत कोणतेही बदल करू नयेत, शेतमालाला हमीभाव लागू करावा, कर्जमाफीची तात्काळ अंमलबजावणी करावी, वाढती महागाई रोखावी, बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, जलजीवन मिशनसह विविध विकासकामांतील अपयशाची चौकशी करावी तसेच जनविरोधी निर्णय मागे घ्यावेत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

राज्य सरकार शेतकरी व सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्यानेच हा जनआक्रोश उफाळून आला असल्याचे नेत्यांनी सांगितले. मागण्या तातडीने मान्य न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

या मोर्चात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्ष अरु धोटे, तालुकाध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे, प्रा. सुग्रीव गोतावळे, गणपत आडे, भीमराव महाराज राठोड, शंतनु धोटे, बालाजी सोनकांबळे, सुदाम राठोड, अमर राठोड, भीमराव पाटील मडावी, रमेश जाधव, विजयकुमार कांबळे, तिरुपती पोले, अमोल कांबळे, सिताराम मडावी, माधव डोईफोडे, प्रदीप काळे, बंडू राठोड, भारत साबणे, ताजुद्दीन शेख, रामदास रणवीर, मारुती मोरे, परमेश्वर केसरे, विजय राठोड, नामदेव जुमनाके, लक्ष्मण कोडापे, बाजीराव वलका, भोजू पाटील आत्राम, दत्ता तोगळे, दत्ता गायकवाड, सुरेश कोडापे, शब्बीर मामू, सोपान शिकारे, सुधाकर नागोसे यांच्यासह महिला पदाधिकारी व जिवती काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, मित्र पक्षांचे कार्यकर्ते, शेतकरी, कामगार, युवक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT