Warora Car Accident
चंद्रपूर : वरोरा शहरातील कोलतेवार कुटुंबावर नियतीने दुहेरी आघात केला आहे. आर्थिक संकटाला कंटाळून पतीने विषप्राशन केल्यानंतर त्याला उपचारासाठी नागपूरला नेत असताना मागून येणाऱ्या पत्नीच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पतीची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरोरा येथील आशीष कोलतेवार यांनी ९ जुलै रोजी आर्थिक विवंचनेतून विषप्राशन केले. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविले. आशीष यांना रुग्णवाहिकेतून नेत असताना त्यांच्या पत्नी तेजस्विनी कोलतेवार या नातेवाईकांसह चारचाकी वाहनातून मागून येत होत्या.
दरम्यान, बुटीबोरी परिसरात कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळली. या भीषण अपघातात तेजस्विनी कोलतेवार यांच्यासह अन्य दोन जण जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचार सुरू असतानाच रविवारी तेजस्विनी कोलतेवार यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांचे निधन झाले. दुसरीकडे, आशीष कोलतेवार यांच्यावर अद्याप उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
या दुहेरी दुर्घटनेमुळे कोलतेवार कुटुंब पूर्णपणे हादरून गेले आहे. दहावीत शिक्षण घेणारी मुलगी आणि लहान मुलगा यांच्यावर आईचे छत्र हरपले असून वडीलही मृत्यूशी झुंज देत असल्याने कुटुंबासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे वरोरा शहरात शोककळा पसरली आहे.