Chandrapur News | डोळे पाणावले : घरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षाच्या चिमुकलीचा मालवाहक ई-रिक्षाच्या धडकेत करुण अंत!

सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील घटना : आई-वडिलांच्या एकुलत्या एक कन्येच्या निधनाने नवरगाव शोकसागरात
मृत श्रीजा महेश गहाणे
मृत श्रीजा महेश गहाणे
Published on
Updated on

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील महादेव मोहल्ल्यात रविवारी दुपारी घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. घराशेजारील रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकलीला भरधाव मालवाहक ई-रिक्षाने जोरदार धडक दिल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच तिची प्राणज्योत मालवल्याने गहाणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण नवरगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

मृत चिमुकलीचे नाव श्रीजा महेश गहाणे (वय २ वर्षे ६ महिने) रा. नवरगाव असे असून ती आई-वडिलांची एकुलती एक कन्या होती. तिच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास श्रीजा आपल्या घराशेजारील रस्त्याच्या कडेला खेळत होती. यावेळी ती रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या एका मालवाहक ई-रिक्षाने तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, श्रीजा गंभीर जखमी झाली. अपघातानंतर घटनास्थळी एकच धावपळ उडाली. स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी तातडीने तिला उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत तिचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. अपघातास कारणीभूत असलेली मालवाहक ई-रिक्षा आणि चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.

शवविच्छेदनानंतर श्रीजाचा मृतदेह नवरगाव येथे आणण्यात आला असता तिच्या अखेरच्या दर्शनासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली. संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. निष्पाप चिमुकलीच्या मृत्यूने उपस्थितांचे डोळे पाणावले. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, निवासी भागातून वेगाने धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news