

चंद्रपूर : गांजा विक्री प्रकरणात गुन्हेगार नसताना सहआरोपी बनवत असल्याचा पोलिसांवर आरोप करत एका इसमाने पोलीस स्टेशनमध्ये विषप्राशन करून आत्महत्या केली. ही घटना चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. दिलीप यादव (४२, रा. रयतवारी, चंद्रपूर ) असे मृत इसमाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर शहर पोलिसांनी बुधवारी भिवापूर परिसरात गांजा विक्री करणारा पांडुरंग बानलवार गांजा विकत असल्याचे पोलिसांना कळले. पोलिसांनी त्याचेकडून १५ हजार रुपये किमतीचा १०० ग्रॅम गांजा जप्त केला व त्याला अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी दिलीप यादव याला सुद्धा सहआरोपी करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये बोलविले होते. दरम्यान शुक्रवारी दिलीप यादव यांनी दुपारच्या सुमारास पोलीस स्टेशमध्ये जाऊन पोलिसांच्या दबावाला कंटाळून विषप्राशन केले असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. विषप्राशन केल्याचे समजताच पोलिसांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान सायंकाळी ७.५५ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
दिलीप २.३० वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशनला आला. त्याने आपली दुचाकी पार्क केली, त्यावेळेस तो उलट्या करीत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. या स्थितीत त्याने पोलीस स्टेशनच्या मागील भागात जाऊन पाहणी केली व उलटी करीतच त्याने विषप्राशन केल्याचे पोलिसांना सांगितले. विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिसांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. दिलीपची गंभीर स्थिती बघून त्याचे व्ह्हेंटिलेटरवर उपचार सुरु झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
गांजाविक्रीमध्ये दिलीपचे नाव पांडुरंग बानलवार यांनी घेतले होते. म्हणून त्याला चौकशीसाठी बोलविण्यात आले. दिलीपवर यापूर्वी १२ गुन्हे दाखल असून काही वर्षांपूर्वी त्याच्याकडून १२ किलो गांजा जप्त करण्यात आला होता. त्याच्या परिवाराने पोलिसांवर दबावाचे लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत. बानलवार यांच्या म्हणन्याप्रमाणे त्याने दिलीप यादव कडूनच गांजा खरेदी केला होता.
निशिकांत रामटेके, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन, चंद्रपूर