Warora Water Scarcity  Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Protest | बेलगावमध्ये पाणीटंचाईवरून उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन; महिलेने टॉवरवर चढून केला निषेध

वरोरा तालुक्यातील बेलगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईची समस्या

पुढारी वृत्तसेवा

Warora Water Scarcity

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील बेलगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत आज गावातील महिलांचा संताप उफाळून आला. महिलांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचा घेराव घातला. आंदोलनादरम्यान एका महिलेने तहसील कार्यालयाच्या मागील टॉवरवर चढून निषेध व्यक्त केल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

बेलगाव गावात मागील काही दिवसांपासून नळयोजना विस्कळीत झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महिलांना पहाटेपासूनच पाण्यासाठी रांगा लावाव्या लागत असून अनेक वेळा रिकाम्या हंड्यांसह परतावे लागत असल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली. वारंवार ग्रामपंचायत आणि संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही समस्या कायम असल्याने अखेर महिलांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

आज सकाळी मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ वरोरा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर जमले. पाणी द्या पाणी द्या अशा घोषणा देत महिलांनी प्रशासनाचा निषेध केला. “पाणी द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करू”, “आम्हाला आश्वासन नको, पाणी हवे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. प्रशासनाने तत्काळ पाणीपुरवठ्याबाबत निर्णय घ्यावा, टँकर सुरू करावेत आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

दरम्यान, आंदोलन अधिक तीव्र करत एका महिलेने तहसील कार्यालयाच्या मागील टॉवरवर चढून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय खाली उतरणार नसल्याची भूमिका तिने घेतल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संबंधित महिलेशी चर्चा करून तिला समजावण्याचे प्रयत्न करण्यात आले.

घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही वेळ चर्चेनंतर प्रशासनाकडून पाणीटंचाईबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर परिस्थिती काहीशी निवळली. मात्र, “जोपर्यंत गावात नियमित पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. बेलगावमधील या आंदोलनामुळे तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT