Chandrapur News | शेतातील मोटरपंप सुरू करताना विजेचा धक्का; युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

पेंढरी मक्ता येथे घटना; उन्हाळी धान पिकाला पाणी देताना काळाचा घाला
Chandrapur News
Chandrapur News
Published on
Updated on

चंद्रपूर : सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता येथील एका युवा शेतकऱ्याचा शेतातील मोटरपंप सुरू करताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.

पेंढरी मक्ता येथील रोहित रविंद्र ढोले (वय २८) हे शनिवारी सकाळी उन्हाळी धान पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. मोटरपंप सुरू करण्यासाठी त्यांनी स्विच ऑन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वीज केबल खराब असल्याने त्यांना अचानक जोरदार विजेचा धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

बराच वेळ रोहित घरी न परतल्याने त्यांच्या वडिलांनी शेतात जाऊन पाहणी केली असता ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मर्ग दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

रोहित ढोले यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. गावातील होतकरू व मेहनती युवा शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news