Chandrapur Tiger News AI-generated image
चंद्रपूर

Chandrapur Tiger News : चंद्रपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये क्षमतेपेक्षा तिप्पट वाघ; तब्बल १० वाघ अन्यत्र हलवणार

दहा वाघांना राज्यातील तसेच राज्याबाहेरील रेस्क्यू सेंटर आणि प्राणिसंग्रहालयांमध्ये हलविण्याचा प्रस्ताव पाठविला आहे.

पुढारी वृत्तसेवा

  • चंद्रपूर येथील ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरमध्‍ये सात वाघांची क्षमता

  • सध्‍या केंद्रात १९ ते २० वाघ; गुजरात, पुण्यातील केंद्रांशी संपर्क

  • क्षमता वाढवून २० वाघांची व्यवस्था करण्याचेही नियोजन

Chandrapur transit treatment center tigers

राजेश्वर येरणे : चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ होत असताना नागरिकांच्या सुरक्षेसाठी पकडण्यात आलेल्या वाघांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. चंद्रपूर येथील ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरची क्षमता केवळ सात वाघांची असताना सध्या या केंद्रात सुमारे १९ ते २० वाघ ठेवण्यात आले आहेत. क्षमतेपेक्षा अधिक वाघांची संख्या झाल्याने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने यातील सुमारे दहा वाघांना राज्यातील तसेच राज्याबाहेरील रेस्क्यू सेंटर आणि प्राणिसंग्रहालयांमध्ये हलविण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. गुजरातमधील बडोदा आणि पुणे येथील केंद्रांशी याबाबत हालचाली सुरू असून, मंजुरी मिळाल्यानंतर वाघांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.

ताडोबासह अन्‍य वनपरिक्षेत्रांमध्ये वाघांची संख्या वाढली

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पासह ब्रह्मपुरी, चिमूर, सावली आणि अन्य वनपरिक्षेत्रांमध्ये वाघांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. जंगलालगतच्या शेतशिवारात, गावांच्या परिसरात तसेच मानवी वस्तीजवळ वाघांचे दर्शन नित्याचे झाले आहे. शेतकरी, शेतमजूर आणि जंगल परिसरात विविध कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांना वाघांपासून धोका निर्माण झाला आहे. वाघांच्या हल्ल्यांत अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाकडून धोकादायक वाघांना बेशुद्ध करून किंवा पिंजऱ्यात पकडून तात्पुरत्या व्यवस्थेसाठी चंद्रपूर येथील ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये आणले जाते.

सात वाघांची क्षमता, प्रत्यक्षात २० वाघ

चंद्रपूर येथील ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये केवळ सात वाघ ठेवण्याची क्षमता आहे. मात्र, जिल्ह्यातील विविध ठिकाणांवरून पकडण्यात आलेल्या वाघांची संख्या सध्या सुमारे १९ ते २० वर पोहोचली आहे. त्यामुळे केंद्रावर क्षमतेपेक्षा जवळपास तिप्पट वाघांचा भार पडला आहे. काही वाघांना या केंद्रात आणून ३० दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. नियमानुसार पकडलेल्या वाघांना या केंद्रात दीर्घकाळ ठेवता येत नसल्याने त्यांना अन्यत्र हलविण्याची गरज निर्माण झाली आहे.

वाघ जेरबंदसाठी विविध उपाययोजना;पण 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ची क्षमता पडतेय अपुरी

विशेष म्हणजे, वाघांना पकडण्यासाठी वनविभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नुकतेच ३० बाय ३० आकाराच्या पिंजऱ्याचा प्रयोग करून एका वाघाला पकडण्यात आले. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणांवरून पकडण्यात आलेल्या वाघांची संख्या वाढत असल्याने केंद्राची क्षमता अपुरी पडत आहे.

गोरेवाडा केंद्रात जागा नाही

चंद्रपूर येथील केंद्रातील वाघांना हलविण्यासाठी ताडोबा व्यवस्थापनाने सुमारे आठवडाभरापूर्वी प्रस्ताव पाठविला आहे. नागपूर येथील गोरेवाडा प्राणिसंग्रहालय पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने तेथे वाघांना हलविणे शक्य होत नाही. त्यामुळे गुजरातमधील बडोदा येथील प्राणिसंग्रहालय तसेच पुणे येथील रेस्क्यू सेंटरमध्ये वाघांना हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत.या प्रस्तावाला संबंधित रेस्क्यू सेंटर आणि प्राणिसंग्रहालयांची अद्याप मंजुरी मिळालेली नाही. मंजुरी मिळाल्यानंतर चंद्रपूर येथील केंद्रातून सुमारे दहा वाघांना अन्यत्र हलविण्यात येणार आहे. यामुळे केंद्रावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

सात वाघांची क्षमता वाढवून २० करण्याचे नियोजन

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांची वाढती संख्या आणि मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरची क्षमता वाढविण्याचेही ताडोबा व्यवस्थापनाने ठरविले आहे. सध्याची सात वाघांची क्षमता वाढवून ती २० वाघांपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.चंद्रपूर येथील केंद्राची क्षमता वाढल्यास जिल्ह्यातील विविध भागांतून पकडण्यात येणाऱ्या वाघांच्या तात्पुरत्या व्यवस्थापनाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. तसेच वाघांना अन्यत्र हलविण्यासाठी उपलब्ध होणाऱ्या पर्यायांवरील अवलंबित्वही कमी होऊ शकते.

केंद्रातील सुमारे दहा वाघांना अन्य राज्यांतील रेस्क्यू सेंटर आणि प्राणिसंग्रहालयांमध्ये हलविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. संबंधित संस्थांकडून मंजुरी मिळाल्यानंतर स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. तसेच चंद्रपूर येथील ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरची क्षमता सातवरून २० वाघांपर्यंत वाढविण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
डॉ. प्रभुनाथ शुक्ला , ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT