

चंद्रपूर : सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड उपवनक्षेत्रांतर्गत सामदा, निलसनी, पेडगाव, सोनापूर व वाघोली-बुटी परिसरात मागील महिनाभरापासून दहशत निर्माण करणाऱ्या आणि तीन गुराख्यांचा बळी घेणाऱ्या T-122 वाघाला जेरबंद करण्यात चंद्रपूर वनविभागाच्या संयुक्त पथकाला अखेर यश आले आहे. वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने प्रथमच ३० बाय ३० फुटांच्या विशेष पिंजऱ्याचा प्रयोग राबविला. या अभिनव प्रयोगासह अधिकारी, कर्मचारी आणि वन्यजीव क्षेत्रातील तज्ज्ञांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे जेरबंदी मोहीम यशस्वी झाली आहे.
सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड उपवनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावांच्या परिसरात T-122 वाघाने मागील महिनाभरापासून धुमाकूळ घातला होता. जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या तीन गुराख्यांचा या वाघाने बळी घेतल्याने शेतकरी, गुराखी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाने २७ सप्टेंबर २०२६ पासून वाघाला जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली होती. मात्र, मानवी अस्तित्वाची चाहूल लागताच वाघ हुलकावणी देत असल्याने पारंपरिक पद्धतीने त्याला पकडण्याचे प्रयत्न वारंवार निष्फळ ठरत होते.
३० बाय ३० फुटांच्या पिंजऱ्याचा अभिनव प्रयोग
वाघाला जेरबंद करण्याच्या मोहिमेत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी चंद्रपूर वनविभागाने ३० बाय ३० फुटांच्या मोठ्या पिंजऱ्याचा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला. मुख्य वनसंरक्षक रामानुजम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विभागीय वन अधिकारी राजन तलमले यांच्या सूचनेनुसार, वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर आणि ब्रह्मपुरी वनविभागाचे जीवशास्त्रज्ञ राकेश आहुजा यांच्या संकल्पनेतून या पिंजऱ्याची रचना तयार करण्यात आली.
सावली वनपरिक्षेत्रातील सामदा परिसरात हा विशेष पिंजरा उभारण्यात आला. वाघाला पकडण्यासाठी त्याचा मागोवा घेणे, हालचालींवर लक्ष ठेवणे आणि योग्य संधी साधणे यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ, वेळ आणि साधनसामग्री लागते. तसेच बेशुद्धीचे औषध देऊन वाघाला पकडण्याच्या प्रक्रियेत संबंधित वन्यप्राण्यालाही त्रास होण्याची शक्यता असते. या अडचणी लक्षात घेऊन अनुभवी वनाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विचारमंथनातून पिंजऱ्याची संकल्पना विकसित करण्यात आली.
या पिंजऱ्यात आमिष प्राणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली असून, त्यावर सतत लक्ष ठेवण्यासाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या प्रयोगामुळे वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्याच्या प्रयत्नांना मदत झाली.
९ सीसीटीव्ही, २० ट्रॅप कॅमेऱ्यांसह चोवीस तास पाळत
या मोहिमेसाठी वनविभागाने व्यापक यंत्रणा कार्यरत ठेवली होती. परिसरात नऊ गरुडा सीसीटीव्ही कॅमेरे, २० ट्रॅप कॅमेरे आणि तीन लाईव्ह कॅमेरे लावण्यात आले होते. सुमारे ५० ते ६० वनकर्मचारी आणि वनमजूर चोवीस तास वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. मुख्य वनसंरक्षक रामानुजम आणि विभागीय वन अधिकारी राजन तलमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे व सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या नेतृत्वात ही कारवाई सुरू होती.
अनोख्या प्रयोगामुळे जेरबंदी मोहिमेला यश
महिनाभरापासून सुरू असलेल्या या मोहिमेत वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने विविध उपाययोजना केल्या. मानवी अस्तित्वाची चाहूल लागताच हुलकावणी देणाऱ्या T-122 वाघाला अखेर ३० बाय ३० फुटांच्या विशेष पिंजऱ्याच्या प्रयोगातून जेरबंद करण्यात यश मिळाले. परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत वनविभागाने राबविलेल्या या मोहिमेमुळे सामदा आणि लगतच्या गावांतील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.