चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी लगतच्या जबराबोडी (मेंढा) परिसरात सोमवारी सकाळी सिंदी आणण्यासाठी गेलेल्या ६२ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्यांचा बळी घेतल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने तात्काळ गस्त वाढवित विशेष मोहीम सुरू केली आहे. वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी वन विभागाने या परिसरात दोन लाईव्ह वजा ट्रॅक कॅमेरे लावले आहेत.
काल रविवारी मेंडकी येथील भास्कर गोविंदा गजभिये हा शेतकरी भारी बांधण्याकरता लागणारे सिंदी आणण्याकरिता जवराबोडी मेंढा जंगल शिवारात सकाळी गेला होता. मात्र रात्र होऊ नये तो घरी परत आला नाही. अखेर काल सकाळी त्याचा मृतदेह जंगल शिवारामध्ये छिन्न विछीन अवस्थेत आढळून आला. त्यामुळे या परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. त्यामुळे वाघाच्या हालचाली टिपून त्याला जेरबंद करण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षा प्रदन करण्याकरता वन विभागाने कंबर कसली आहे.
वनविभागाच्या माहितीनुसार, पहाटे पासून पाच वाजेपासून रात्रीपर्यंत 10 वनकर्मचारी व 5 मजुरांचे पथक त्या परिसरात गस्त घालते आहे. तसेच वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी २ लाईव्ह कॅमेरे आणि १० ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कॅमेर्यांच्या मदतीने निगराणी ठेवली जात असली तरी, घटनेनंतर अद्याप वाघाची कोणतीही हालचाल आढळून आलेली नाही. त्यामुळे वन विभागाची चिंता अधिक वाढलेली आहे.
मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना वनविभागाच्या वतीने तातडीने २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली असून, उर्वरित आर्थिक मदत प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सध्या मेंडकी परिसरात धान कापणी आणि भारे बांधणीचा हंगाम जोरात सुरू आहे. शेतकरी व शेतमजूरांना शिवारात जाणे आवश्यक असताना या घटनेनंतर भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांना सावध करण्यासाठी दवंडी पिटवून 'सकाळच्या सुमारास कोणीही जंगलात किंवा शेतात जाऊ नये' असा इशारा परिसरात देण्यात आला आहे.
वनअधिकाऱ्यांनी सांगितले की, कॅमेर्यांमध्ये वाघाच्या हालचाली आढळल्यास त्याला जेरबंद करण्याची प्रक्रिया तातडीने राबविण्यात येईल. वनविभागाचे पथक सतत शेतशिवार व जंगल परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत बचावात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.