

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील भिसी-शंकरपूर-आंबोली-आसोला शेतशिवारात दहशत माजवणारा नरभक्षक ‘कालू’ वाघ अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला. शंकरपूर येथील ईश्वर भरडे यांचा बळी घेतल्यापासून या वाघाने परिसरात भीतीचं साम्राज्य निर्माण केलं होतं. नागरिकांचा चक्काजाम आंदोलनानंतर वनविभागाने तातडीने मोहीम राबवत आज सोमवारी सायंकाळी या वाघाला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.
चिमूर तालुक्यातील भिसी - शंकरपूर - आंबोली - आसोला या गावांना हादरवून सोडणाऱ्या नरभक्षक ‘कालू’ वाघाचा अखेर बंदोबस्त करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी शंकरपूर येथील शेतकरी ईश्वर भरडे यांच्यावर या वाघाने हल्ला करून त्यांचा जागीच मृत्यू केला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत आणि अस्वस्थता पसरली होती.
भरडे यांच्या मृत्यूनंतर रोषाच्या भरात स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले होते. नागरिकांची मागणी होती की वाघाला पकडून जंगलात हलवावे किंवा त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. सतत वाढत चाललेल्या प्रसंगामुळे शेतकऱ्यांचे दैनंदिन कामकाज बंद पडले आणि शेतकरी जीव मुठीत धरून शेतात जात होते.
नागरिकांच्या या आंदोलनाने वनविभागावर मोठा दबाव निर्माण झाला. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी, ट्रॅकिंग पथक आणि तज्ञांनी वाघाचा मागोवा घेण्यासाठी मोहीम सुरू केली. परिसरात चारही बाजूंनी पिंजरे लावण्यात आले तसेच रात्री-दिवस गस्त ठेवण्यात आली.
शेवटी आज सायंकाळी कालू वाघ वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. वाघ जेरबंद झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून आनंद व्यक्त केला. वनविभागाच्या माहितीनुसार, या नरभक्षक वाघामुळे आतापर्यंत तीन जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे या वाघाला पकडणे अत्यंत आवश्यक झाले होते.
हा वाघ पकडण्यात आला असला तरी या परिसरात अजूनही काही वाघांचा वावर सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात जाताना काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. “आम्ही काही दिवसांपासून शेतात जायला घाबरत होतो. आता तरी जीव वाचेल,” अशी प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने दिली. शेतकऱ्यांनी एकटे शेतात जाणे टाळावे, रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये, वाघाचा वावर दिसल्यास तातडीने वनविभागाला कळवावे असे आवाहन वन विभागाने केले आहे.