Historical Research Stone Pillars Tadoba Pudhari
चंद्रपूर

Tadoba News | ताडोबातील दगडी-विटांचे मार्गदर्शक खांब भोसलेकालीन : प्रा. सुरेश चोपणे यांचा संशोधनातून दावा

Chandrapur News | चंद्रपूर–ताडोबा–चिमूर–उमरेड–नागपूर मार्गावरील खांब ब्रिटिश किंवा गोंड काळातील नसून भोसले राजांनी बांधल्याचे संशोधनातून नवे पुरावे

पुढारी वृत्तसेवा

Historical Research Stone Pillars Tadoba

चंद्रपूर : चंद्रपूर ते नागपूर या मार्गावर जंगलातून जाणाऱ्या जुन्या रस्त्याची ओळख म्हणून उभारलेले दगडी आणि विटांचे खांब हे ब्रिटिश किंवा गोंड राजांनी बांधलेले नसून भोसले राजांच्या काळात उभारण्यात आले होते, असा दावा इतिहास अभ्यासक व भूशास्त्र-पुरातत्त्व संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी केला आहे. गोंड, भोसले आणि ब्रिटिश काळाचा सखोल अभ्यास, तसेच गॅझेटियर आणि ऐतिहासिक कागदपत्रांचे परीक्षण केल्यानंतर त्यांनी हा निष्कर्ष मांडला आहे.

ताडोबातील खांब आजही सुरक्षित

चंद्रपूर ते नागपूर या जुन्या मार्गावर शेकडो मार्गदर्शक खांब उभारले गेले होते. मात्र कालांतराने त्यापैकी बहुतांश खांब तुटले किंवा नष्ट झाले. ताडोबा परिसरातील दाट जंगलामुळे काही खांब आजही सुरक्षित राहिले आहेत. प्रा. चोपणे यांच्या माहितीनुसार सध्या ताडोबा परिसरात सुमारे ३५ दगडी आणि ९ विटांचे खांब आढळून येतात. चंद्रपूर ते ताडोबा तलावापर्यंतचे खांब प्रामुख्याने वाळूच्या दगडांपासून तयार केलेले आहेत, तर पुढे नागपूरच्या दिशेने काही खांब विटांपासून बनविलेले दिसतात. या खांबांची उंची जवळपास १५ फूट असून तळाशी त्यांची जाडी सुमारे २.५ फूट आहे. दोन खांबांमधील अंतर साधारण १०० मीटर ठेवण्यात आले होते, ज्यामुळे दाट जंगलात मार्ग ओळखणे सोपे व्हावे.

खांबांच्या रचनेत विशेष वैशिष्ट्य

या खांबांच्या वरच्या भागावर ‘यू’ आकाराचे दगड बसविलेले दिसतात. हे दगड पुढील खांबाकडे दिशा दाखविण्यासाठी विशेष पद्धतीने बसविले गेले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जातो.

काही संशोधकांच्या मते या रचनेचा उपयोग दोरी किंवा घंटा बांधण्यासाठीही केला गेला असावा. जंगलातील वन्यजीवांपासून सावध राहण्यासाठी किंवा मार्गदर्शनासाठी या घंटांचा वापर केला गेला असावा, असेही प्रा. चोपणे सांगतात.

गोंड राजांच्या काळात हा मार्ग वापरात नव्हता

इतिहासाच्या अभ्यासानुसार नागपूर परिसरात गोंड राजांचे राज्य १६व्या ते १७व्या शतकात होते. देवगडचे जाटबा, नंतर भक्त बुलंद आणि चांद सुलतान यांसारखे गोंड राजे नागपूर भागात राज्य करत होते.

मात्र प्रा. चोपणे यांच्या मते गोंड राजांचे राज्य प्रामुख्याने चंद्रपूर, कळंब आणि माहूर या परिसरात केंद्रित होते. नागपूर आणि चंद्रपूर यांच्यात सतत ये-जा होत असल्याचे कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे चंद्रपूर-ताडोबा-नागपूर हा मार्ग त्यांनी बांधला असावा, अशी शक्यता कमी आहे.

याशिवाय गोंड राजांच्या बांधकामात प्रामुख्याने दगडांचा वापर केला जात असे. विटांचा वापर त्यांनी क्वचितच केला. मात्र ताडोबा परिसरात आढळणाऱ्या काही खांबांमध्ये विटांचा वापर असल्यामुळे हे बांधकाम गोंड काळातील नसावे, असेही प्रा. चोपणे स्पष्ट करतात.

भोसले राजांनी उभारला मार्ग

नागपूरमध्ये भोसले घराण्याचे राज्य १८व्या शतकात सुरू झाले. कान्होजी भोसले यांनी १७४२ च्या सुमारास नागपूरमध्ये सत्ता प्रस्थापित केली, तर पुढे रघुजी भोसले यांनी गोंड राज्यावर विजय मिळवत नागपूर-चंद्रपूर भागावर नियंत्रण मिळवले.

प्रा. चोपणे यांच्या संशोधनानुसार नागपूर ते चंद्रपूर दरम्यान वारंवार प्रवास करण्याची गरज असल्यामुळे भोसले राजांनी चंद्रपूर – ताडोबा – चिमूर – उमरेड – नागपूर हा जंगलातून जाणारा मार्ग विकसित केला.

या मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांना दिशा कळावी म्हणून १०० मीटर अंतरावर मार्गदर्शक खांब उभारण्यात आले. याच काळात बल्लारपूर आणि चंद्रपूर किल्ल्यांची पुनर्बांधणी, रामाळा तलावाची दुरुस्ती आणि मुरलीधर मंदिराचे बांधकामही भोसले राजांनी केले होते.

व्यापारासाठीही मार्ग महत्वाचा

त्या काळात चंद्रपूर आणि सावली परिसरात मोठ्या प्रमाणावर कापूस आणि सुती वस्त्रांचे उत्पादन होत असे. हा माल नागपूरच्या बाजारात पोहोचवण्यासाठी सुरक्षित मार्गाची आवश्यकता होती. याच कारणामुळे भोसले राजांनी हा जंगलमार्ग विकसित करून मार्गदर्शक खांब उभारले. त्यामुळे व्यापारी, प्रवासी आणि राजकीय अधिकारी यांना जंगलात मार्ग ओळखणे सोपे होत असे.

विटांच्या बांधकामाचा वापर ; भोसलेकालीन वैशिष्ट्य

इतिहासकारांच्या मते भोसले राजांनी नागपूर-पुणे-चंद्रपूर भागात विटांच्या बांधकामाला प्राधान्य दिले. त्या काळात इंग्रज आणि गोंड राजे मुख्यतः दगडी बांधकाम करीत असत. भोसले राजांच्या या विटांच्या वापराबद्दल इंग्रजांनी काही ठिकाणी टीकात्मक नोंदीही केल्या आहेत. त्यामुळे ताडोबा परिसरातील विटांचे खांब भोसलेकालीन असल्याचे संकेत मिळतात.

ब्रिटिशांच्या नोंदीत या खांबांचा उल्लेख नाही

ब्रिटिशांनी १८५४ नंतर चंद्रपूर जिल्ह्यात सत्ता प्रस्थापित केली. त्यांच्या प्रशासनात प्रत्येक बांधकामाची तपशीलवार नोंद, बिल आणि अहवाल तयार केला जात असे. प्रा. चोपणे यांनी चंद्रपूर व नागपूर गॅझेटियर तसेच आर्थिक अहवालांचा अभ्यास केला असता चंद्रपूर-ताडोबा-चिमूर-नागपूर रस्त्याच्या किंवा खांबांच्या बांधकामाची कोणतीही नोंद आढळत नाही. ब्रिटिशांनी चंद्रपूर जिल्ह्यात मुख्यतः चंद्रपूर-वरोरा-जाम आणि चंद्रपूर-मूल-ब्रह्मपुरी हे दोन रस्ते विकसित केल्याची नोंद आढळते. त्यामुळे ताडोबा मार्गावरील खांब ब्रिटिशांनी बांधले असावेत, ही शक्यता संशोधनात नाकारली जाते.

गॅझेटियरमधील नोंद दुरुस्त करण्याची मागणी

ताडोबा परिसरातील खांब ब्रिटिशकालीन असल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. मात्र ऐतिहासिक पुरावे आणि संशोधनाच्या आधारे ही माहिती चुकीची असल्याचे प्रा. सुरेश चोपणे यांनी नमूद केले आहे. त्यामुळे चंद्रपूर गॅझेटियरमधील नोंद दुरुस्त करून हे खांब भोसले राजांनी उभारले असल्याचा उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ताडोबा जंगलातील दगडी आणि विटांचे मार्गदर्शक खांब हे विदर्भाच्या इतिहासातील महत्त्वाचे पुरावे मानले जातात. गोंड, भोसले आणि ब्रिटिश काळाच्या तुलनात्मक अभ्यासातून हे खांब भोसलेकालीन रस्ते व्यवस्थेचा भाग असल्याचे संकेत मिळतात. त्यामुळे या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि संशोधन अधिक व्यापकपणे होण्याची गरज असल्याचेही चोपणे यांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT