तीन गुराख्यांचा बळी घेणाऱ्या T-122 वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने आता ३० फूट बाय ३० फूट आकाराच्या विशेष पिंजऱ्याचा प्रयोग सुरू केला आहे.  Pudhari News
चंद्रपूर

Chandrapur News : वाघाला जेरबंद करण्यासाठी ३० बाय ३० फुटांच्या पिंजऱ्याचा 'प्रयोग'; सामदा परिसरात वनविभागाची विशेष मोहीम

तीन गुराख्यांचा बळी घेणाऱ्या वाघावर ५० ते ६० कर्मचाऱ्यांची २४ तास पाळत

पुढारी वृत्तसेवा

T-122 tiger capture Chandrapur

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा: सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड उपवनक्षेत्रांतर्गत सामदा, निलसनी, पेडगाव, सोनापूर आणि वाघोली-बुटी परिसरात मागील महिनाभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या आणि तीन गुराख्यांचा बळी घेणाऱ्या T-122 वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने आता ३० फूट बाय ३० फूट आकाराच्या विशेष पिंजऱ्याचा प्रयोग सुरू केला आहे. मानवी अस्तित्वाची चाहूल लागताच हुलकावणी देणाऱ्या या वाघाला पकडण्यासाठी वनविभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, अत्याधुनिक कॅमेरे आणि मोठ्या मनुष्यबळाच्या मदतीने वाघाच्या हालचालींवर चोवीस तास लक्ष ठेवले जात आहे.

सामदा परिसरासह लगतच्या गावांमध्ये T-122 वाघाची दहशत

सामदा परिसरासह लगतच्या गावांमध्ये T-122 वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी, गुराखी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या तीन गुराख्यांचा या वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे वनविभागाने २७ सप्टेंबर २०२६ पासून वाघाला जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मात्र, वाघ वारंवार हुलकावणी देत असल्याने अद्याप या मोहिमेला यश आलेले नाही.

क्षेत्रीय अनुभवातून पिंजऱ्याची संकल्पना

वाघाचा मागोवा घेणे, त्याच्या हालचालींवर संनियंत्रण ठेवणे आणि त्याला सुरक्षितपणे जेरबंद करणे यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ व वेळ लागतो. पारंपरिक पद्धतीने वाघाला बेशुद्ध करण्यासाठी औषधाचा वापर करावा लागतो. ही प्रक्रिया वाघासाठीही त्रासदायक ठरू शकते. या क्षेत्रीय अडचणींवर मात करण्यासाठी अनुभवी वनाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चर्चेतून ३० बाय ३० फुटांच्या पिंजऱ्याची संकल्पना पुढे आली.मुख्य वनसंरक्षक रामानुजम यांच्या नेतृत्वाखाली आणि विभागीय वनाधिकारी राजन तलमले यांच्या मार्गदर्शनात, वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर व जीवशास्त्रज्ञ राकेश आहुजा यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग सामदा क्षेत्रात सुरू करण्यात आला आहे. पिंजऱ्याच्या आत आमिष प्राणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली असून, त्यावर सतत लक्ष ठेवण्यासाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नऊ सीसीटीव्ही, २० ट्रॅप कॅमेऱ्यांसह पाळत

या मोहिमेसाठी नऊ गरुडा सीसीटीव्ही कॅमेरे, २० ट्रॅप कॅमेरे आणि तीन लाइव्ह कॅमेरे लावण्यात आले आहेत. सुमारे ५० ते ६० वनाधिकारी, कर्मचारी आणि वनमजूर वाघाच्या हालचालींवर चोवीस तास पाळत ठेवत आहेत. नियोजनबद्ध पद्धतीने संयुक्त मोहीम राबवून वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.मुख्य वनसंरक्षक रामानुजम आणि विभागीय वनाधिकारी राजन तलमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक विकास तरसे व सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या नेतृत्वात ही मोहीम सुरू आहे. या मोहिमेत इको-प्रोचे संस्थापक अध्यक्ष बंडू धोत्रे, मानद वन्यजीव रक्षक मुकेश भांदककर, वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर, जीवशास्त्रज्ञ अक्षय नारनवरे, पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सेवानिवृत्त सहायक आयुक्त डॉ. छोनकर यांच्यासह व्याहाड उपवनक्षेत्रातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत. याशिवाय वनरक्षक, क्षेत्र सहायक, एसटीपीएफ पथक, मूल, आरआरयू पथक, चंद्रपूर, वनमजूर आणि पीआरटी चमू या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत आहेत.

सूचनांचे काटेकोर पालन करण्‍याचे वनविभागाचे आवाहन

T-122 वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, या संयुक्त मोहिमेत निश्चितच यश मिळेल, असा विश्वास वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. वाघ जेरबंद होईपर्यंत नागरिकांनी वनविभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, जंगल परिसरात अनावश्यक जाणे टाळावे आणि मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT