Food poisoning chandrapur 
चंद्रपूर

Food poisoning chandrapur | विषबाधा झालेल्या 30 विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर; आज विद्यार्थ्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

नगराळा आश्रमशाळेतील प्रकार;दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईचे व्यवस्थापनाचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील नगराळा येथील अमृत नाईक खासगी आश्रमशाळेत वरणाच्या भांड्यात पाल पडल्याने विषबाधा झालेल्या सर्व 30 विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या या विद्यार्थ्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या घटनेला जबाबदार असलेल्या दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्रमशाळा व्यवस्थापनाने आश्वासन दिले आहे.

नगराळा येथील अमृत नाईक खासगी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या वरणाच्या भांड्यात पाल पडल्याचा प्रकार सोमवारी सकाळी घडला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर काही वेळातच त्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकाच वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी रुग्णालयात दाखल झाल्याने प्रशासनातही खळबळ उडाली. डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून उपचार सुरू केले. उपचारादरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात आले.

आज डिस्चार्ज मिळणार...

राजुरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, विषबाधा झालेल्या सर्व ३१ विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. उपचारानंतर विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन

या घटनेनंतर आश्रमशाळेतील भोजन व्यवस्था आणि स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अन्नाच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्याचे आढळून आल्यास संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्रमशाळेचे संचालक श्रीनिवास जाधव यांनी आश्वासन दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT